बिहारमध्ये फडणवीस भाजपचे 'कारभारी'

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाने बिहारची जबाबदारी सोपविली आहे.
BJP appoints devendra fadnavis as bihar poll in charge
BJP appoints devendra fadnavis as bihar poll in charge

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  बिहारमधील सत्तारूढ भाजपचे प्रभारी म्हणून आज अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली. पक्षाने बिहारची धुरा आता फडणवीस यांच्या खांद्यावर सोपविली आहे. भाजप आघाडीच्या जागावाटपाची चर्चा येत्या एक-दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याचेही पक्षाने म्हटले आहे. 

भाजपचे बिहार प्रभारी भूपेंद्र यादव, फडणवीस व अन्य नेत्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संघटनमंत्री बी. एस. संतोष आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याबरोबर आज दिल्लीत चर्चा केली. त्यानंतर यादव यांनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. या वेळी  फडणवीस म्हणाले की, बिहारच्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वाटणारे प्रेम व स्नेह आणि एनडीए सरकारचे काम या जोरावर आगामी निवडणुकीत आमचा विजय निश्‍चित आहे. भाजप कार्यकर्ता म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणार आहे. बिहारमध्ये एनडीएला यश मिळवून देणार आहे. एनडीए एक सशक्त आघाडी म्हणून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली मजबुतीने ही निवडणूक लढेल व जिंकेल.

भाजप, नितीशकुमार यांचा जदयू, रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष व जीतनराम मांझी यांचा पक्ष यासह सर्व मित्रपक्षांतील जागावाटपाची चर्चा येत्या एक-दोन दिवसांत संपेल, असे भूपेंद्र यादव यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी एनडीएकडे 42 जागांची मागणी केली आहे. चिराग पासवान यांनी जागावाटपात ताठर भूमिका घेतली आहे. त्याबाबत यादव यांनी काहीही भाष्य करणे टाळले. मात्र, येत्या दोन दिवसांत जागावाटप मार्गी लागेल, असा विश्‍वास यादव यांनी व्यक्त केला.

फडणवीस यांचा महाराष्ट्रातील दीर्घ अनुभव बिहारमध्ये भाजपसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे सांगून यादव म्हणाले की, गेले दोन महिने फडणवीस हे बिहार निवडणुकीची तयारी करीत आहेत. पक्षनेतृत्वाने त्यांचे नाव बिहारचे निवडणूक प्रमुख म्हणून निश्‍चित केले आहे. भाजप आघाडीच्या सरकारमध्ये गेली 15 वर्षे सुरू असलेल्या बिहारच्या विकासयात्रेला 'आत्मनिर्भर बिहार'च्या दिशेने घेऊन जाण्याच्या कटिबध्दतेसह भाजप या निवडणुकीत उतरला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या गरीबकेंद्रित धोरणांबाबत बिहारच्या जनतेमध्ये अनुकूल भावना आहे. यंदा कोरोनामुळे बिहार निवडणुकीचा प्रचार व्हर्च्युअल पध्दतीनेही करावा लागत आहे त्याबाबतची माहितीही मी आणि फडणवीस यांनी पक्षनेत्यांना दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com