भाजप, विश्व हिंदू परिषद, आमीर खान अन् असहिष्णुतेची दंगल... - bjp and vhp target aamir khan on meeting with turkeys first lady | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप, विश्व हिंदू परिषद, आमीर खान अन् असहिष्णुतेची दंगल...

वृत्तसंस्था
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने आता आमीर खान याच्याविरोधात मोहीम सुरू केली आहे. याचवेळी आमीर खानच्या समर्थनार्थही अनेक जण मैदानात उतरत आहेत. 
 

नवी दिल्ली : अभिनेता आमीर खान हे तुर्कस्तानच्या दौऱ्यावर आहेत. तेथे त्याने तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसीप तय्यीप एर्दोगान यांच्या पत्नीची भेट घेतली. या भेटीमुळे भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने आमीरला लक्ष्य केले आहे. याचबरोबर आमीरच्या पाठिंब्यासाठी अनेक जण मैदानात उतरले असून, असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

आमीर खान हा लालसिंग चढ्ढा या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तुर्कस्तान दौऱ्यावर आहेत. त्यांनी तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांच्या पत्नी एमिन यांची अध्यक्षीय निवासस्थानी 15 ऑगस्टला भेट घेतली होती. या भेटीनंतर एमिन एर्दोगान यांनी ट्विट केले असून, त्यांनी म्हटले आहे की, आज जागतिक ख्यातीचे भारतीय अभिनेते आमीर खान यांची भेट घेण्याचा योग आला. तुर्कस्तानमध्ये विविध ठिकाणी लालसिंग चढ्ढा चित्रपटाचे चित्रीकरण त्यांनी केले याचा मला आनंद आहे. 

या वेळी आमीर याने एमिन यांच्याशी तो राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमांबाबत चर्चा केली. आमीर खान करीत असलेल्या समाज कार्याबद्दल एमिन यांनी आमीरचे अभिनंदनही केले, अशी माहिती तुर्कस्तानच्या अध्यक्षीय कार्यालयाने दिली आहे. 

आमीर खान याची भेट आता भारतात वादग्रस्त बनू लागली आहे. सोशल मीडियावरही आमीर याला लक्ष्य करण्यात येत आहे. भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने आता त्याच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. याला कारण आहे तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगान यांची भारतविरोधी भूमिका. त्यांनी काश्मीरसह अनेक मुद्द्यावर भारत सरकारच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. 

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, आमीर खान यांनी कोणाची भेट घ्यावी ही त्यांची खासगी बाब आहे. परंतु, देशाचे नागरिक म्हणून त्यांची काही जबाबदारी आहे. भारतीयांच्या प्रेमामुळे ते आमीर खान बनले आहेत. भारतविरोधी वक्तव्य करणाऱ्या तुर्कस्तानच्या अध्यक्षांच्या पत्नीला ते कसे भेटले? भारताचा नागरिक म्हणून आमीर यांनी याचा विचार करायला हवा होता. 

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता विनोद बन्सल म्हणाले की, आजकाल काही व्यक्ती आणि अभिनेत्यांना भारताला विरोध करणाऱ्यांविषयी फार प्रेम वाटू लागले आहे. भारतीय प्रेक्षकांनी ज्यांना डोक्यावर घेतले ते आज भारतविरोधी तुर्कस्तानमध्ये जात आहेत. तेथील अध्यक्षांच्या पत्नीला भेटत आहेत. आता भारतीय प्रेक्षकांनाही याचा विचार करावा लागेल. 

भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने आमीर विरोधात मोहीम सुरु केली असताना आमीरला अनेक जण पाठिंबा देत आहेत. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असा निवाडा करणे चुकीचे आहे. आपण कोणाच्या निष्ठेबद्दल प्रश्न उपस्थित करु शकत नाही. आमीर खान कोणाला भेटले ही त्यांची व्यक्तिगत बाब आहे. मात्र, यावरुन त्यांना सोशल मीडियावर होणारी शिवीगाळ योग्य नाही. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख