गटबाजीमुळे उदगीरमध्ये भाजपचे दोन तालुकाध्यक्ष अन्‌ चार सरचिटणीस...

गटबाजीमुळे उदगीरमध्ये भाजपचे दोन तालुकाध्यक्ष अन्‌ चार सरचिटणीस...

उदगीर : उदगीर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली असून परिणामी दोन तालुकाध्यक्ष आणि चार सरचिटणीसांची नेमणूक करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भाजपमधील दोन्ही गटांमधील मतभेद चव्हाट्यावर आले असून स्वतंत्र बैठका घेत त्यांनी आपापल्या गटातून तालुकाध्यक्ष आणि सरचिटणीस नेमले आहेत. आता यापैकी अधिकृत कोण ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे . 

विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या जखमा ताज्या असतांनाच पंचायत समिती निवडणुकीत देखील दोन सदस्य फुटल्याने भाजपाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता बुधवारी (ता.1) तालुका अध्यक्षांच्या निवडीत वेगवेगळ्या दोन गटांनी स्वतंत्र बैठका घेऊन आपापले अध्यक्ष जाहीर केल्याने तालुक्‍यातील भाजपमधील कलह टोकाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव यांना उमेदवारी न दिल्याने पक्षातील एक गट नाराज होता. 

नाराज गटाने 2014 च्या निवडणुकीत माजी आमदार केंद्रे यांच्या समर्थकांनीच पक्षाचे काम केले नाही असा पलटवार केला होता. भाजपमधील स्थानिक नेतेच एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत असल्यामुळे मग पक्षात खरे निष्ठावंत उरले तरी किती? असा सवाल सामान्य कार्यकर्ते करत आहेत. नाराज गटाच्या वतीने नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांच्या उपस्थितीत भाजपा तालुकाध्यक्षपदी वसंत शिरसे यांची तर शहराध्यक्षपदी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, तालुका सरचिटणीसपदी लक्ष्मण जाधव यांची निवड करण्यात आली. 

दुसरीकडे भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, भगवान पाटील तळेगावकर यांच्या उपस्थित पक्ष निरीक्षकांनी तालुकाध्यक्षपदी बसवराज रोडगे, शहराध्यक्षपदी उदयसिंग ठाकूर, तालुका सरचिटणीस म्हणून प्रदीप जाधव, भागवत गुरमे, शैलेश देमगुंडे यांची निवड केली आहे. या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे म्हणाले, संघटनात्मक निवडणुकीत तालुका अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी प्रदेश पातळीवर निवडणूक निरीक्षक ठरलेले असतात. उदगीर तालुक्‍यासाठी सोमेश्वर सोप्पा यांची तर शहरासाठी मनोहर पटणे यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी केलेल्या निवडीच अधिकृत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com