"मंदिर, मशिद, गुरुद्वारा, ठाकरे सरकार खोलो दोबारा..." - BJP agitates for opening temples, mosques and Jain temples | Politics Marathi News - Sarkarnama

"मंदिर, मशिद, गुरुद्वारा, ठाकरे सरकार खोलो दोबारा..."

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

अनेकठिकाणी भाजपतर्फे मशिदी व जैनमंदिरे उघडण्यासाठी देखील आंदोलन करण्यात आले. मंदिर, मशिद, गुरुद्वारा, ठाकरे सरकार खोलो दोबारा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

मुंबई : येत्या दोन दिवसांत राज्य सरकारने राज्यातील मंदिरे उघडली नाहीत तर भारतीय जनता पक्ष सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेऊन सारी मंदिरे उघडेल, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे दिला. विशेष म्हणजे आज अनेकठिकाणी भाजपतर्फे मशिदी व जैनमंदिरे उघडण्यासाठी देखील आंदोलन करण्यात आले. मंदिर, मशिद, गुरुद्वारा, ठाकरे सरकार खोलो दोबारा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

लॉकडाउनच्या काळात भाविकांसाठी कुलुपबंद असलेली सर्वधर्मीय मंदिरे उघडण्याचा आदेश राज्य सरकारने द्यावा, यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. मागठाणे परिसरातील अशोकवन येथील हनुमान मंदिरात झालेल्या घंटानाद आंदोलनप्रसंगी दरेकर बोलत होते. केंद्राने सर्वधर्मीय मंदिरे उघडण्यास संमती दिली आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार धर्माच्या, हिंदुत्त्वाच्या व या प्रक्रियेच्या विरोधात असल्याचे दिसते, अशी टीकाही त्यांनी केली. एकीकडे महसुलासाठी दारु दुकाने, मॉल उघडतात, पण मंदिरे बंदच आहेत हे दुर्दैवी आहे. अजूनही सरकार जागे झाले नाही, तर भाजपतर्फे सर्व मंदिरे उघडली जातील, असाही इशारा त्यांनी दिला.

मशिदीही उघडण्याची मागणी
भाजपच्या दक्षिण मध्य मुंबई विभागातर्फे स्थानिक मशिदींसमोरही आंदोलन करून मशिदी उघडण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर, आमदार प्रसाद लाड, नगरसेविका शीतल देसाई, राजश्री शिरवडकर आदींनी प्रथम दादर पोलिस ठाण्यात जाऊन मंदिरात प्रवेश करू देण्याची मागणी केली. परवानगी देणे आमच्या हाती नाही, असे पोलिसांनी सांगितल्यावर हे सर्व जण कार्यकर्त्यांसह सिद्धीविनायक मंदिरासमोर जाऊन त्यांनी तेथे आंदोलन केले. त्यानंतर वडाळ्याचे विठ्ठल मंदिर व राम मंदिर येथे आंदोलन केल्यावर वडाळ्याची हरी मस्जिद व अँटॉप हिलच्या दर्ग्यावरही विश्वस्तांसह हे आंदोलन करण्यात आले. "मंदिर, मशिद, गुरुद्वारा, ठाकरे सरकार खोलो दोबारा.." अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. भाविकांना अध्यात्मिक समाधान आणि मनःशांती मिळावी यासाठी सरकारने देवळे उघडावीत, अशी मागणी श्रीमती देसाई यांनी यावेळी केली.

संबंधित लेख