'बायोलॉकिल ई'ची मेड इन इंडिया कोरोना लस ठरणार क्रांतिकारी

केंद्र सरकारने हैदराबादमधील बायोलॉजिकल-ई या कंपनीशी कोरोना लशीच्या पुरवठ्यासाठी करार केला आहे.
biological e company covid vaccine will be game changer
biological e company covid vaccine will be game changer

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आता हैदराबादमधील बायोलॉजिकल-ई (Biological-E) या कंपनीशी कोरोना लशीच्या (Covid Vaccine) पुरवठ्यासाठी करार केला आहे. सरकारने या कंपनीला 1 हजार 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी दिला असून, कंपनी 30 कोटी डोस देणार आहे. या मेड इन इंडिया (Made in India) लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून, ती 90 टक्के प्रभावी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे कोरोना (Covid-19) विरोधातील लढ्यात ही लस अतिशय महत्वाची ठरणार आहे. 

लसीकरणविषयक तांत्रिक सल्लागार गटाचे प्रमुख डॉ.एन.के.अरोरा म्हणाले की, बायोजॉजिकल ई कंपनीची कोर्बेव्हॅक्स ही लस नोव्होव्हॅक्सच्या लशीप्रमाणे आहे. नोव्होव्हॅक्स ही 90 टक्के परिणामकारक आढळली आहे. याचप्रमाणे कोर्बेव्हॅक्सही 90 टक्के परिणामकारक सिद्ध होईल. आधीच्या अनुभव पाहता ही लस ज्या प्रकारची आहे त्यांचा सर्व वयोगटात चांगला परिणाम दिसतो. ही लस ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होईल. तिची परिणामकारकताही नोव्होव्हॅक्सप्रमाणे असेल.  

झायडस कॅडिलाची एमआरएनए लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत ही लस उपलब्ध होईल. तिची साठवणूक, वाहतूक भारतात सहजपणे करता येईल, अशी आहे. भारतात आता अनेक लशींवर काम सुरू आहे. अनेक लशींच्या चाचण्या सुरू आहेत. हे पाहता लवकरच भारत रास्त दरात जगाला लस पुरवठा करणारा देश बनेल, असे अरोरा यांनी सांगितले. 

देशात सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही मेड इन इंडिया लस उपलब्ध आहे. आता या जोडीला बायोलॉजिकल-ई या कंपनीची लस पुढील काही महिन्यांत उपलब्ध होणार आहे. या कंपनीने लशीचे उत्पादन करुन साठा करुन ठेवल्याने ही लस लवकर मिळणार आहे. सध्या या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ही लस परिणामकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. 

केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने बायोलॉजिकल-ई कंपनीला सुरवातीला 100 कोटी रुपयांचे अर्थ साह्य केले होते. याचबरोबर या विभागाने अनेक संशोधनात कंपनीसोबत भागीदारी केली आहे. देशातील लस उत्पादक कंपन्यांना पाठबळ देण्यासोबत प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. याचबरोबर सरकारी आणखी पाच ते सहा लस उत्पादक कंपन्यांना पाठबळ देत आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे.  केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com