उमेदवारांना दुचाकी रॅली काढता येणार नाही; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय - bike rallies will not be allowed in pollbound states says election commission | Politics Marathi News - Sarkarnama

उमेदवारांना दुचाकी रॅली काढता येणार नाही; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मार्च 2021

देशातील पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये  आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. 

नवी दिल्ली : देशातील पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये  आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च ते 29 एप्रिल कालावधीत होत आहेत. आता निवडणूक आयोगाने दुचाकी रॅलींबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दुचाकींवरुन मतदारांना धमकावण्याचे प्रकार केले जातात त्यामुळे दुचाकी रॅलींवर बंदी घालण्यात आली आहे. 

अनेक ठिकाणी उमेदवार दुचाकी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करतात. मात्र, त्यांना यापुढे दुचाकी रॅली काढता येणार नाही. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, काही ठिकाणी दुचाकींवरुन समाजकंटक मतदारांना मतदानाच्या आधी अथवा मतदानादिवशी धमकावतात. त्यामुळे दुचाकी रॅलींवर बंदी घालण्यात येणार आहे. निवडणूक होत असलेल्या राज्यांत ही बंदी मतदानाच्या दिवसाआधी 72 तास आणि मतदानादिवशी असेल. 

तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम या राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील एकूण 824 विधानसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत 18.68 कोटी मतदार आहेत. एकूण 2.7 लाख मतदान केंद्रे असणार आहेत. सर्व ठिकाणी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचा (सीएपीएफ) पुरेसा बंदोबस्त असणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रावरही सीएपीएफ तैनात असेल. सर्व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांनी फ्रंटलाईन वर्कर मानले जाणार आहे.  

निवडणूक तारखा : 
तमिळनाडू : एकाच टप्प्यात 6 एप्रिल  
पश्चिम बंगाल : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल, आठवा टप्पा  29 एप्रिल 
केरळ : एकाच टप्प्यात 6  एप्रिल, मल्लपुरम विधानसभा पोटनिवडणूक 6 एप्रिल  
आसाम : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल  
पुद्दुचेरी : एकाच टप्प्यात 6 एप्रिल 
सर्व राज्यांतील मतमोजणी : 2 मे 

विधानसभा निवडणकू होणार असलेल्या पाचपैकी सध्या केवळ एकाच ठिकाणी आसाममध्ये भाजपची सत्ता आहे. तर पुदुच्चेरीमध्ये सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसची पाचपैकी एकाही ठिकाणी सत्ता नाही. आसाममधील सत्ता टिकविण्यासह अन्य राज्यांत सत्तेत येण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. पाचही राज्यांमध्ये भाजप, काँग्रेससह स्थानिक प्रादेशिक पक्षांकडून निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख