राजकीय प्रतिक्रिया नाही, असे म्हणत नीतिशकुमार घसरले मुंबई पोलिसांवर... - bihar chief minister nitish kumar targets mumbai police again | Politics Marathi News - Sarkarnama

राजकीय प्रतिक्रिया नाही, असे म्हणत नीतिशकुमार घसरले मुंबई पोलिसांवर...

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येच्या तपासावरुन उठलेला गदारोळ अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने संपला आहे. मात्र, या प्रकरणावरुन सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप मात्र, सुरूच आहे.   

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. मुंबई पोलिसांना याबाबत सर्व सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या तपासावरुन मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला गदारोळ अखेर थांबला आहे. मात्र, राजकीय आरोपप्रत्यारोपांची राळ सुरूच आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना लक्ष्य केले आहे. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालयानेही (ईडी) उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर यावर आता कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे सांगून बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार म्हणाले की, तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करणे हे बिहार पोलिसांचे कर्तव्य होते. कारण मुंबई पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले नाही. आयपीएस अधिकाऱ्याला देण्यात आलेली वागणूक सर्वांना माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने या प्रकरणी घडले ते योग्य नव्हते हे सिद्ध झाले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे या प्रकरणी बिहार पोलिसांचा तपास आणि एफआयआर योग्य होता, हे सिद्ध झाले आहे. सुशांतचे कुटुंबीयच नव्हेत तर सर्व देशालाचा या प्रकरणी चिंता होती. सीबीआय तपासामुळे न्याय मिळेल, अशी आशा जनतेला आहे, असे नीतिशकुमार यांनी स्पष्ट केले. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख