बिहारमध्ये भाजपचा 'खेला होबे'? सरकारी कार्यक्रमातून मुख्यमंत्री नितीशकुमार 'गायब'

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जेडीयू आणि भाजपचे सरकार सत्तेवर आहे. मात्र, सरकारी कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांचा फोटोच गायब झाला आहे.
bihar chief minister nitish kumar photograph is missing from government program
bihar chief minister nitish kumar photograph is missing from government program

पाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपचे सरकार सत्तेवर आहे. मात्र, सरकारी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा फोटोच नसल्याने मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. यावरुन भाजप आणि जेडीयूतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विरोधी पक्षांनी बिहारमध्ये भाजपचा 'खेला होबे' सुरू झाल्याचा आरोप केला आहे. 

भाजप नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी कटिहारमध्ये शंभर खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन केले. त्यावेळी आरोग्यमंत्री मंगल पांडे हेसुद्धा हजर होते. कार्यक्रमाच्या मंचावर लावलेल्या बॅनरवर प्रसाद आणि पांडे यांचे फोटो होते. मात्र, मुख्यमंत्री नितीशकुमारांचा फोटो गायब होता. याबद्दल सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेखही बॅनरवर नव्हता. 

या प्रकारामुळे संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते आणि कार्यकर्ते भडकले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले कटिहारचे उपमहापौर व जेडीयूचे नेते सूरज प्रकाश राय यांनी याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. बरारी येथील आमदार विजयसिंह यांनीही नितीशकुमारांचा फोटो नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र, त्यांनी यात आयोजकांचा दोष असल्याचा दावा केला. याचबरोबर राज्यातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले. 

विरोधी पक्षांनी मात्र, हा प्रकार भाजपचा 'खेला होबे' असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी म्हणाले की, आधी भाजपने अरुणाचलमध्ये जेडीयूच्या आमदारांना फोडले. आता भाजप बिहारमध्ये खरे रंग दाखवू लागला आहे. भाजपला नितीशकुमारांना सत्तेतून हटवायचे आहे. यासाठी भाजपकडून हा खेळ सुरू असून, हा भाजपचा 'खेला होबे' आहे. 

कमी जागा येऊनही मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार 
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. दुसऱ्या क्रमांकावर 74 जागांसह भाजप होता. जेडीयूला 43 जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला 19 जागा मिळाल्या होत्या. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर भाजपने नितीशकुमार यांचेच नाव पुढे केले होते. आता मात्र, भाजप आणि जेडीयूमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. 

अरुणाचलमध्ये भाजपकडून विश्वासघात 
अरूणाचलमध्ये जेडीयूचे सात आमदार होते. यातीस सहा आमदारांनी जेडीयूला सोडचिठ्ठी देऊन भाजपशी घरोबा केला होता. अरुणाचलमधील 60 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत जेडीयूचा केवळ एक आमदार उरला आहे. यामुळे पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलचा एक आमदार पकडून भाजपचे संख्याबळ आता 48 वर गेले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com