पाटणा : बिहारमधील भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात नव्याने 17 मंत्र्यांचा समावेश झाला आहे. यामुळे राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता 30 वर गेली असली तरी अद्याप सहा जागा रिकाम्या आहेत. आजच्या मंत्रिमंडळात भाजपचे वरिष्ठ नेते शहनवाज हुसेन आणि अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा चुलतभाऊ नीरजसिंह बबलू यांचा समावेश आहे.
राज्यपाल फागू चौहान यांनी 17 नवीन मंत्र्यांना शपथ दिली. यात भाजपचे 9 आणि जेडीयूचे 8 मंत्री आहेत. यात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन, प्रमोद कुमार, आलोक रंजन झा, नितीन नवीन, नारायण प्रसाद, नीरजसिंह बबलू, सुभाषसिंह, सम्राट चौधरी यांचा समावेश आहे. जेडीयूच्या मंत्र्यांमध्ये श्रवणकुमार, संजय झा, लेसी सिंह, सुनीलकुमार, जयंत राज, मदन साहनी, सुमितसिंह, जमा खान यांचा समावेश आहे.
Bihar: BJP's Shahnawaz Hussain took oath as Minister in Patna; 17 Ministers inducted in the State Council of Ministers. pic.twitter.com/FAmiJmQ7hb
— ANI (@ANI) February 9, 2021
नव्या मंत्र्यांमध्ये प्रथमच मंत्रिमंडळात समावेश झालेले भाजपचे मंत्री अधिक आहेत. भाजपने अधिक नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, जेडीयूने मात्र, मागील वेळी मंत्रिमंडळात असलेल्यांना प्राधान्य दिले आहे. नितीश सरकारचा शपथविधी मागील 16 नोव्हेंबरला झाला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यासमवेत 14 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र, नंतर मेवालाल चौधरी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र, याला भाजपकडून विलंब लावला जात आहे. विस्तारासाठी भाजपकडून नावे दिली जात नसल्याचे खुद्द नितीशकुमारांनी उघड केले होते. यामुळे दोन्ही पक्षांतील मतभेद दूर झाले नसल्याचे समोर आले होते. नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कधीही मंत्रिमंडळ विस्ताराला एवढा कालावधी लागलेला नव्हता. नितीशकुमारांनीच याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, याआधी कधीही मला मंत्रिमंडळ विस्तारास एवढा वेळ लागला नव्हता. आम्ही सुरवातीलाच मंत्रिमंडळ विस्तार करीत होतो.
Edited by Sanjay Jadhav

