तेजस्वींना वाढदिवसाचे सर्वांत मोठे गिफ्ट मुख्यमंत्रिपदाची खुर्ची! - Biggest birthday gift to Tejashwi is CMs throne says Tej Pratap Yadav | Politics Marathi News - Sarkarnama

तेजस्वींना वाढदिवसाचे सर्वांत मोठे गिफ्ट मुख्यमंत्रिपदाची खुर्ची!

वृत्तसंस्था
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव हे सत्तास्थापना करतील, असे अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात येत आहेत. 

पाटणा : बिहारमध्ये सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) - भाजपची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) - काँग्रेसच्या महाआघाडीत सत्तेसाठी रस्सीखेच राहणार आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे पारडे जड दिसत आहे. तेजस्वी यादव यांचा आज  32 वा वाढदिवस असून, त्यांना वाढदिवसाचे सर्वांत मोठे गिफ्ट मिळाल्याचे त्यांचे मोठे बंधू तेजप्रताप यादव यांनी जाहीर केले आहे.  

तेजस्वी यादवांच्या वाढदिवसाची आज बिहारमध्ये मोठी धामधूम सुरू आहे. त्यांना शुभेच्छा देणारी पोस्टर सगळीकडे दिसत आहेत. याचबरोबर कायकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. तेजस्वी यांचे मोठे बंधू तेजप्रताप यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. आरजेडीकडून तेजस्वींना वाढदिवसाचे सर्वांत मोठे गिफ्ट म्हणून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली आहे, असे तेजप्रताप म्हणाले. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा टुटू...मुख्यमंत्री तेजस्वी शुभेच्छा, असे ट्विटही तेजप्रताप यादव यांनी केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये तेजस्वी यादव यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केल्याने त्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे.  

टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीला मोठे यश मिळेल. महाआघाडीतील आरजेडी 180, काँग्रेस 11 जागा आणि एनडीएतील भाजप 55 आणि जेडीयू 11 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इतर पक्षांना 8 आणि अपक्षांना 4 जागा मिळतील, असेही म्हटले आहे. 

ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 114, महाआघाडीला 120, लोक जनशक्ती पक्षाला 3 आणि इतरांना 6 जागा मिळतील. टीव्ही 9 भारतवर्षच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 115, महाआघाडीला 120, लोक जनशक्ती पक्ष 4 आणि इतरांना 4 जागा मिळतील. 

इंडिया टु़डे - माय अॅक्सिस एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत तेजस्वी यादव हे आघाडीवर आहेत. तेजस्वी यादव यांना 44 टक्के, नितीशकुमार यांना 35 टक्के आणि चिराग पासवान यांना 7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. जनतेकडून मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांनाच पसंती असल्याचे म्हटले आहे. 

टाईम्स नाऊ - सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 116 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचवेळी महाआघाडीला 120 जागा मिळतील, असे म्हटले आहे. लोक जनशक्ती पक्षाला केवळ एक जागा मिळेल असे म्हटले असून, इतरांना सहा जागा मिळतील. 

रिपब्लिक टीव्ही जन की बातच्या एक्झिट पोलनुसार आरजेडीला बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळतील. एनडीएला 91 ते 117, महाआघाडीला 118-138, लोक जनशक्ती पक्ष 5 ते 8 आणि इतरांना 3 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बिहारच्या विधानसभेचे संख्याबळ 243 असून, बहुमतासाठी 122 जागा आवश्यक आहेत. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा 3 नोव्हेंबरला झाला असून, यात ९४ मतदारसंघ होत. तिसरा टप्पा आज झालाअसून, यात ७८ मतदारसंघ होते. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख