शिवसेनेच्या भास्कर जाधवांची राष्ट्रवादीतील पुत्रासाठीची खेळी अखेर यशस्वी - bhaskar jadhav son vikrant jadhav elected as ratnagiri zp president | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेच्या भास्कर जाधवांची राष्ट्रवादीतील पुत्रासाठीची खेळी अखेर यशस्वी

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 मार्च 2021

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत भास्कर जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अंजनवेल (गुहागर) गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले विक्रांत भास्कर जाधव यांची वर्णी लागली आहे. निवडणूक बिनविरोध झाली. विक्रांत हे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र आहेत. भास्कर जाधव हे शिवसेनेत गेले असले तरी त्यांचे पुत्र विक्रांत हे मात्र, अद्याप राष्ट्रवादीत आहेत. 

'मातोश्री'वरुन विक्रांत जाधव यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाल्याने इतर नावे मागे पडली. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा होती. परंतु, जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ पुत्राच्या गळ्यात पाडून घेण्यात त्यांनी अखेर यश मिळवले आहे. खुद्द भास्कर जाधव यांचे बंधू बाळ जाधव यांचे पुत्र बाळाशेठ जाधव हेसुद्धा शिवसेनेकडून शर्यतीत होते. 

रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेनेला बहुमत आहे. शिवसेनेचे संख्याबळ 39 आणि राष्ट्रवादीचे 16 आहे. टीआरपी येथील पदाधिकारी निवासस्थानी आज झालेल्या बैठकीत नावे जाहीर करण्यात आली. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी सर्वांनी उमेदवारी अर्ज भरले. अध्यक्षपदासाठी आमदार जाधव यांनी खेळलेली खेळी यशस्वी ठरली आणि गुहागरला प्रथमच अध्यक्षपद मिळाले. तसेच, चंद्रकांत मणचेकर (लांजा), रेश्‍मा झगडे (दापोली), भारती सरवणकर (राजापूर), परशुराम कदम (रत्नागिरी) या शिवसेना सदस्यांना सभापतिपदाची संधी मिळाली आहे. 

प्रत्येक पदासाठी फक्त एकच अर्ज दाखल झाला. सर्व अर्ज वैध ठरल्यानंतर अध्यक्ष, विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड झाल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी जाहीर केले. निवडणुकीनंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार जाधव, आमदार साळवी, महेश नाटेकर, रोहन बने, डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.

बनेंची नाराजी दूल करण्याचा प्रयत्न 
शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य उदय बने यांना उपाध्यक्षपदासह बांधकाम व आरोग्य सभापतिपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. निवडीनंतर बने यांनी आपल्याला पक्ष वाढवायचा आहे, असे मनोगत व्यक्त केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख