यामुळेच कोव्हॅक्सिनची किंमत अधिक; भारत बायोटेकच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण - bharat biotech says covaxin covid vaccine production is costly | Politics Marathi News - Sarkarnama

यामुळेच कोव्हॅक्सिनची किंमत अधिक; भारत बायोटेकच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था
रविवार, 25 एप्रिल 2021

केंद्र सरकारने राज्ये आणि खासगी रुग्णालयांना लस उत्पादकांकडून थेट कोरोना लस घेण्याची परवानगी दिली आहे. आता लशीच्या किमतीवरुन वाद सुरू झाला आहे. 
 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्ये आणि खासगी रुग्णालयांना लस उत्पादकांकडून थेट कोरोना लस घेण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड ही लशीची किंमत जाहीर केली होती. या किमतीवरुन गदारोळ सुरू असतानाच आता भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लशीची किंमत जाहीर केली आहे. या किमतीचे समर्थन भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एम. एल्ला यांनी केले आहे. 

राज्य सरकारांना कोव्हॅक्सिन प्रतिडोस ६०० रुपयांना मिळेल. खासगी रुग्णालयांना ही लस १ हजार २०० रुपयांना मिळेल. इतर देशांसाठी या लशीचा दर १५ ते २० डॉलर असेल, अशी माहिती भारत बायोटेकने दिली आहे. सिरमने राज्य सरकारांना 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना देण्याचे जाहीर केले आहे. याचवेळी केंद्र सरकारला मात्र, ही लस 150 रुपयांतच ही लस मिळत आहे. केंद्राच्या तुलनेत जास्त किंमत राज्यांना का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

यावर भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एम. एल्ला म्हणाले की, कोरोनावरील नाकातून देण्यात येणाऱ्या लशीवर आम्ही संशोधन करीत आहोत. यासाठी आम्हाला खर्च भरून काढणे आवश्यक आहे. मागील २५ वर्षांपासून आमचे ध्येय हेच राहिले आहे की जनतेला परवडण्याजोग्या दरात जागतिक दर्जाची आरोग्य व्यवस्था उपलब्ध करुन देणे. या लशीचा निर्मिती खर्चिक आहे. उत्पादन खर्च, उत्पादन केंद्र आणि वैद्यकीय चाचण्या यांचा खर्च धरून लशीची किंमत निश्चित करण्यात आली आहे. 

या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, कोव्हिशिल्ड लशीची किंमत राज्यांसाठी 400 रुपये आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोपीय समुदाय, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेला यापेक्षा कमी किमतीत लस दिली जात आहे. मग मेड इन इंडिया लस आणि भारतीयांनाच सर्वांत जास्त किंमत का? सिरमनेच म्हटले आहे की 150 रुपयांत लस विकूनही त्यांना नफा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी लशीची किंमत कमी करायला हवी. 

याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवरच उत्तर दिले होते. भारत सरकारचा दोन्ही लशींचा खरेदीदर 150 रुपयेच राहणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या लशी राज्यांना मोफतच देण्यात येईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. परंतु, राज्ये आणि खासगी रुग्णालयांसाठी लशीची किंमत कमी करण्याबाबत मंत्रालयाने काहीच उल्लेख केलेला नाही. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख