कोव्हॅक्सिनची किंमत कोव्हिशिल्डच्या तुलनेत राज्यांसाठी दीडपट अन् खासगी रुग्णालयांसाठी दुप्पट

केंद्र सरकारने राज्ये आणि खासगी रुग्णालयांना लस उत्पादकांकडून थेट कोरोना लस घेण्याची परवानगी दिली आहे.
bharat biotech announces price of covaxin covid vaccine
bharat biotech announces price of covaxin covid vaccine

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्ये आणि खासगी रुग्णालयांना लस उत्पादकांकडून थेट कोरोना लस घेण्याची परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशिल्ड ही लशीची किंमत जाहीर केली होती. या किमतीवरुन गदारोळ सुरू असतानाच आता भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लशीची किंमत जाहीर केली आहे. सिरमच्या लशीच्या तुलनेत ही किंमत राज्यांसाठी दीडपट आणि खासगी रुग्णालयांसाठी दुप्पट आहे. 

राज्य सरकारांना कोव्हॅक्सिन प्रतिडोस ६०० रुपयांना मिळेल. खासगी रुग्णालयांना ही लस १ हजार २०० रुपयांना मिळेल. इतर देशांसाठी या लशीचा दर १५ ते २० डॉलर असेल, अशी माहिती भारत बायोटेकने दिली आहे. सिरमने राज्य सरकारांना 400 रुपयांना तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना देण्याचे जाहीर केले आहे. याचवेळी केंद्र सरकारला मात्र, ही लस 150 रुपयांतच ही लस मिळत आहे. केंद्राच्या दुप्पट किंमत राज्यांना का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, कोव्हिशिल्ड लशीची किंमत राज्यांसाठी 400 रुपये आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोपीय समुदाय, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेला यापेक्षा कमी किमतीत लस दिली जात आहे. मग मेड इन इंडिया लस आणि भारतीयांनाच सर्वांत जास्त किंमत का? सिरमनेच म्हटले आहे की 150 रुपयांत लस विकूनही त्यांना नफा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी लशीची किंमत कमी करायला हवी. 

याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्विटरवरच उत्तर दिले आहे. भारत सरकारचा दोन्ही लशींचा खरेदीदर 150 रुपयेच राहणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या लशी राज्यांना मोफतच देण्यात येईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. परंतु, राज्ये आणि खासगी रुग्णालयांसाठी लशीची किंमत कमी करण्याबाबत मंत्रालयाने काहीच उल्लेख केलेला नाही. 


याबाबत आधी बोलताना सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले होते की, केंद्रीय आरोग्य मंत्रालय व अर्थ मंत्रालयाने कोरोना लशीच्या उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणारी पावले उचलली आहेत. याअंतर्गत राज्य सरकारे, खासगी रुग्णालये आणि लसीकरणे केंद्रे थेट कोरोना लशीची खरेदी करु शकतात. पुढील दोन महिन्यांत सिरमने उत्पादन वाढवण्यावर भर देण्याचा निर्मय घेतला आहे. लशीच्या एकूण उत्पादनाच्या 50 टक्के केंद्र सरकारच्या लसीकरण कार्यक्रमाला आणि उरलेले 50 टक्के राज्य सरकारे आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे.  

कोव्हिशिल्ड लशीच्या एका डोससाठी राज्यांना 400 रुपये मोजावे लागतील. याचवेळी खासगी रुग्णालयांना यासाठी 600 रुपये द्यावे लागतील. पुढील 4 ते 5 महिन्यांत ही लस किरकोळ विक्रीसाठी खुल्या बाजारात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे, असेही पूनावाला यांनी म्हटले होते. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com