कर्नाटकात येडियुरप्पांची गच्छंती होऊन लवकरच नवीन मुख्यमंत्री; बड्या भाजप नेत्याचा दावा - basangouda yatnal says yediyurappa will step down and new chief minister will take place | Politics Marathi News - Sarkarnama

कर्नाटकात येडियुरप्पांची गच्छंती होऊन लवकरच नवीन मुख्यमंत्री; बड्या भाजप नेत्याचा दावा

वृत्तसंस्था
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

कर्नाटकात सत्ताधारी भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर येत असताना आता मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आला आहे.  

बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी नुकताच मंत्रिमंडळ विस्तार केला होता. यातील खातेवाटपावरुन वाद होऊन मुख्यमंत्र्यांनी पाच दिवसांत चार वेळा मंत्र्यांचा खातेबदल करण्याचा विक्रम केला होता. अद्यापही येडियुरप्पांच्याबद्दल पक्षातील नाराजी कायम असून, 'उगाडी' सणाला नवीन मुख्यमंत्री राज्यात दिसेल, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते बसनगौडा पाटील-यतनाळ यांनी केला आहे. 

कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे मागील वर्षभरापासून कायम होते. यामुळे अनेक नेते नाराज होते. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले नेते अस्वस्थ झाले असून, ते मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि सरकारला लक्ष्य करीत होते. अखेर मंत्रिमंडळ विस्तार येडियुरप्पांनी जाहीर केला होता. एम.टी.बी. नागराज, उमेश कत्ती, अरविंद लिंबावली, मुरूगेश निरानी, आर. शंकर, सी.पी.योगेश्वर, अंगारा एस. यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. त्यांचा नुकताच शपधविधी झाला होता.   

मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप जाहीर केल्यानंतर नाराजीमुळे त्यांना 24 तासांत मंत्र्यांचा खातेबदल करावा लागला होता. तरीही नाराजी कायम होती. यामुळे नंतर पाच दिवसांत चार वेळा खातेबदल करण्यात आला होता. येडियुरप्पांनी एक प्रकारे खातेबदलाचा विक्रमच केला आहे. यात काही मंत्र्यांकडील मोठी खाती काढून त्यांना छोटी खाती देण्यात आली आहे. यामुळे अनेक मंत्र्यांची नाराजी कायम आहे. 

माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे आमदार बसनगौडा पाटील-यतनाळ यांनी येडियुरप्पांची लवकरच गच्छंती होईल, असे भाकित वर्तवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यात 13 एप्रिलला 'उगाडी' सणाला नवीन वर्ष साजरे होत असताना मुख्यमंत्रीही नवीन आलेला दिसेल. नवीन मुख्यमंत्री हा राज्याच्या उत्तर भागातील असेल. मी आता मंत्रिपदासाठी येडियुरप्पांकडे जाणार नाही. आमच्यापैकी कोणीतरी मुख्यमंत्री होईल आणि इतरांना मंत्रिपदे दिली जातील. हे नक्की घडणार असून, तुम्ही प्रतीक्षा करा. 

मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा आणि माजी मुख्यमंत्री व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच.डी.कुमारस्वामी हे पुन्हा एकत्र आले आहेत. येडीयुरप्पा आणि कुमारस्वामी यांच्या एकत्र येण्याने राज्यात नवीन समीकरणे उदयास येऊ शकतात, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. याचबरोबर पुढील निवडणुका ते एकत्र लढू शकतात, अशीही अटकळ बांधली जात आहे. कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतिपदी भाजपचे एम.के.प्राणेश यांनी निवड झाली आहे. जेडीएसच्या पाठिंब्यावर ही निवड झाली आहे. 

येडीयुरप्पा आणि कुमारस्वामी एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या एकत्र येण्यामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. येडीयुरप्पा आणि भाजप नेतृत्वाचे संबंध मागील काही काळापासून ताणलेले आहेत. मात्र, राज्यात येडीयुरप्पा यांना डावलणे शक्य नसल्याने भाजप नेतृत्वाची कोंडी झाली आहे. येडीयुरप्पा यांच्यावर पदावरुन पायउतार होण्यासाठी दबाव आणल्यास ते नवीन पक्ष स्थापन करु शकतात, अशी चर्चा मागील काही काळापासून सुरू आहे. यासाठी ते जेडीएसची मदत घेऊ शकतात, अशीही चर्चा सुरू आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख