शरद पवारांच्या घरी एच. के. पाटलांसह थोरात, चव्हाण पण पटोलेंची दांडी - Balasaheb Thorat, Ashok Chavan Meets Sharad Pawar amid speculations | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

शरद पवारांच्या घरी एच. के. पाटलांसह थोरात, चव्हाण पण पटोलेंची दांडी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

ती लहान माणसे आहेत त्यांच्यावर मी कशाला बोलू?, असा टोला शरद पवार यांनी लगावला होता.

मुंबई : काँग्रेसचे (Congress) पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil) यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. दोन्ही ठिकाणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हजर होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पाटील यांच्यासह काँग्रेस नेते गेले. पण पटोले यांनी त्याकडे पाठ फिरवल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Balasaheb Thorat, Ashok Chavan Meets Sharad Pawar amid speculations)  

पटोले यांच्याकडून सातत्याने होत असलेली स्वबळाची भाषा, पाळत ठेवल्याचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर आरोप तसेच अजित पवारांवर केलेली टीका यांमुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यातच पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख, मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप आदी उपस्थित होते. 

हेही वाचा : वाद पेटला; भाजपच्या आठ आमदारांचा विविध समित्यांचा राजीनामा

पत्रकार परिषदेनंतर पाटील, थोरात व चव्हाण हे तिघे शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले होते. ही सदिच्छा भेट असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पण सकाळपासून पाटील व अन्य नेत्यांसोबत असलेले पटोले पवारांच्या घरी गेले नाहीत. यावरून ते पवारांवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी भेटीला न जाण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्या अनुपस्थितीने पुन्हा एकदा तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.  

नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत, महाविकास आघाडीमध्ये पाठीत सुरा खुपसला जात आहे. असे म्हटले होते. याबाबत शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना पटोले यांना टोला लगावला होता. 'ती लहान माणसे आहेत त्यांच्यावर मी कशाला बोलू? जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो,' असं पवार म्हणाले होते. त्यामुळं पटोले नाराज असल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा : देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण आज पुन्हा सापडला पॉझिटिव्ह

पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीत कोणताही वाद नसल्याचे जाहीर केले. तसेच नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या पाळत ठेवल्याच्या आरोपाबाबतही स्पष्टीकरण दिलं. पटोले यांना केंद्र सरकार म्हणायचे होते, असे पाटील यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते पटोले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी असल्याचे सोनिया गांधींनी सांगितले आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे. फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद त्यांच्याकडे आहे.”

‘‘महाराष्ट्रात काँग्रेस उभी होत असल्याचे त्यांना माहिती आहे. आयबीचा अहवाल रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरु आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी इथे आहे याचीही अहवाल गेला असेल. रात्री ३ वाजता माझी सभा पार पडली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था आहे,” असे वक्तव्य करत नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख