आजबे आष्टीत बाजीगर ठरतील का ?

भाजपच्या उमेदवारामागे इथल्या वंजारा समाजाची मते राहणार यात शंका नाही. दुसरीकडे धस यांच्यामुळे मराठा मतांचेही ध्रुवीकरण होणार आहे. अशावेळी भीमराव धोंडे, सुरेश धस यांच्या राजकारणाला छेद देत बाळासाहेब आजबे मतदारसंघात राष्ट्रवादीला पुन्हा वैभव मिळवून देण्यात यशस्वी होतात का ? यावरच त्याचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.
आजबे आष्टीत बाजीगर ठरतील का ?

आष्टी : राष्ट्रवादीशी बंडखोरी केलेल्या माजी मंत्री सुरेश धस यांना पर्याय म्हणून राष्ट्रवादीने भाजपमधून आलेल्या बाळासाहेब आजबे याना बळ दिले आहे. अनेक वर्षापासून आष्टी-पाटोदा मतदारसंघात मजबूतपणे उभ्या असलेल्या सुरेश धस व भाजपच्या विद्यामान आमदार भीमराव धोंडे यांना पराभूत करून राष्ट्रवादीच्या विजयाची पताका फडकावण्याचे शिवधनुष्य आजबे यांना पेलणार का? हा प्रश्‍न आजबे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधल्या प्रवेशानंतर उपस्थित केला जात आहे. 

आष्टी पाटोदा मतदारसंघातले राजकारण गेली काही वर्षे धस आणि धोंडे यांच्याभोवतीच या ना त्य कारणाने फिरत आहे. आष्टी-पाटोदा मतदारसंघात सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचा डोलारा समर्थपणे सांभाळला होता. पण जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पंकजा मुंडे यांना साथ देत सत्ता मिळवून दिली. यावरून बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीत चांगलेच महाभारत घडले. आरोप-प्रत्यारोप आणि खालच्या पातळीवरची टिका दोन्ही बाजूंनी झाली. सहा वर्ष पक्षातून निलंबित केल्यानंतर सुरेश धस यांनी भाजपची कास धरली. त्यांचा अजून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला नसला तरी पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर त्यांचा वावर पहायला मिळतो. 

धस यांच्या बंडखोरी आणि निलंबनानंतर आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपमधील नाराज बाळासाहेब आजबे यांचा पर्याय निवडला. 2014 मध्ये विधानसभेची उमेदवारी मागणाऱ्या आजबेंची भाजपने जिल्हा परिषदेवर बोळवण केल्याने ते नाराज होतेच. राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधून त्यांनी आपल्या नाराजीला मोकळी वाट करून दिली. अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आजबे यांचा राष्ट्रवादीत मोठ्या थाटात प्रवेश झाला. 

या सोहळ्यात अजित पवार, धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर सदस्य विकल्याचा आरोप करतांना त्यांना गद्दार ठरवले. या आरोप प्रत्यारोपानंतर कडाक्‍याच्या थंडीतही जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले होते. अरे ला ? का रे ? म्हणण्याचा धस यांचा स्वभाव असल्याने त्यांनी देखील धनंजय मुंडे यांना आरोपांवर ठाम राहा, तुमच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकतो असा इशारा देऊन टाकला. 

मतदारसंघातली नेते आणि धनंजय मुंडेंचा वावर त्यांच्यातील आरोपांचा धुरळा उडत असताना बाळासाहेब आजबे आष्टी-पाटोदा मतदारसंघात पक्षाची बांधणी पुन्हा कशी करणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. 

आश्वासक चेहरा 
बाळासाहेब आजबेंच्या रूपाने आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादीला आश्वासक चेहरा मिळाला आहे. निर्भीड, स्पष्टवक्ते व तळागाळातील लोकांशी थेट संपर्क असणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. फायद्या-तोट्याचा विचार न करता स्पष्टपणे मत व्यक्त करणे, ही आजबेंची खासियत. जनसामान्यांशी त्यांची नाळ जुळली असल्याने त्यांचा जनाधारही मोठा आहे. राष्ट्रवादीला आजबे मतदारसंघात वैभवाचे दिवस आणून देतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतो. 

पंचायत समिती सदस्य असलेल्या आजबेंना दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी भाजपकडून 2009 मध्ये विधानसभेची उमेदवारी दिली होती. धस-धोंडे-दरेकर असे मातब्बर मैदानात असतांनाही आजबेंनी 85 हजार मते घेत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, या मतदारसंघात वंजारा मतांची संख्या मोठी आहे. मुंडेंमुळे सहाजिकच ही मते आजबेंच्या पारड्यात पडली होती हे विसरून चालणार नाही. 

आजबे यांचे वडिलांनी भाऊसाहेबांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले असल्याने बाळासाहेबांना राजकीय पार्श्‍वभुमी होतीच. 2014 मध्ये आष्टीतून भाजपने आजबेंना टाळत भीमराव धोंडेंना उमेदवारी दिली. धोंडेंच्या बाजूने आजबेंसह माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी उभी केलेली ताकद आणि त्यांच्या माळी समाजाच्या हक्काच्या मतदानासह वंजारा समाजाचेही मतदान त्यांच्या पारड्यात पडल्याने धोंडें विजयी झाले. सुरेश धस यांनी त्यावेळी एकहाती किल्ला लढवत धोंडे यांना चांगलीच टक्कर दिली होती. 

विधानसभा निवडणुकीनंतर अनेक घडामोडी झाल्या, पक्षाने उमेदवारी देतांना आपल्या टाळले याची सल आजबे यांच्या मनात घर करून होतीच, आणि ही सल त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आमदार होण्याचे स्वप्न पाहिले होते पण पक्षाने त्यांची जिल्हा परिषदेवर बोळवण केली होती याशिवाय पक्षाचे कुठल्याही महत्वाच्या पदासाठीही त्यांचा विचार केला नाही. 

जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीत असलेल्या सुरेश धस यांनी जिल्ह्याच्या राजकारणात भूकंप घडवला आणि अस्वस्थ आजबेंना नवा घरोबा मिळाला. पण त्यांच्या समोर आव्हान मोठे आहे. राष्ट्रवादीची मोट बांधणारे सुरेश धस आता भाजपच्या साथीला आले आहेत. मतदारसंघाची खडा न खडा माहिती असलेले धस इथे राष्ट्रवादीला पुन्हा पाय रोवू द्यायचे नाही या इराद्यानेच काम करणार आहे. 


भाजपच्या उमेदवारामागे इथल्या वंजारा समाजाची मते राहणार यात शंका नाही. दुसरीकडे धस यांच्यामुळे मराठा मतांचेही ध्रुवीकरण होणार आहे. अशावेळी भीमराव धोंडे, सुरेश धस यांच्या राजकारणाला छेद देत बाळासाहेब आजबे मतदारसंघात राष्ट्रवादीला पुन्हा वैभव मिळवून देण्यात यशस्वी होतात का ? यावरच त्याचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com