
Maval BJP : भाजपची राज्य कार्यकारिणी बुधवारी (ता. ४) जाहीर झाली. त्यात मावळचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. दरम्यान, २०१९ पासून तालुक्यात झालेल्या सर्व निवडणुकांत भाजपला पराभव स्विकारावा लागला आहे. नुकत्याच झालेल्या मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतही बाळा भेगडे यांच्या नेतृत्वातील पॅनेलचा सपाटून पराभव झाला आहे. त्यानंतरही त्यांना हे पद दिल्याबद्दल मावळात आता उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
भाजपच्या (BJP) लोकसभा प्रवास योजनेचे प्रदेश संयोजक असलेल्या बाळा भेगडेंना (Bala Bhegde) प्रदेश उपाध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे मावळातील गणेश भेगडेंचे पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, १५ मे पूर्वी नवे जिल्हाध्यक्ष भाजपला मिळणार असल्याची चर्चा आहे. गणेश भेगडेंना जिल्हाध्यक्ष म्हणून आपली छाप सोडता आलेली नाही. भाजप पक्षाचे तालुकाध्यक्षही रविंद्र भेगडे आहेत.
दरम्यान, पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत बाळा भेगडेंच्या जोडीने गणेश भेगडेंना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. त्यामुळे भाजप आणि भेगडे हे मावळातच नाही, तर राज्यातही आता समीकरण बनले आहे. परिणामी भाजपात भेगडे यांच्याशिवाय इतर कुणी कर्तबगार पदाधिकारी, कार्यकर्ते मावळात नाहीत का, अशा चर्चांना उधाण आले आहे.
मावळ बाजार समितीच्या (APMC Election) निवडणुकीत बाळा भेगडेंच्या पॅनेलचा प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या पॅनेलने १७-१ असा दणदणीत पराभव केला. तत्पुर्वी तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजप तथा भेगडेंना अपेक्षित यश मिळाले नव्हते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही त्यांना ते मिळाले नव्हते.
मावळ (Maval) या भाजपच्या बालेकिल्ल्याची पडझड शेळकेंनीच २०१९ ला प्रथम सुरु केली. त्यांनी बाळा भेगडेंचा धक्कादायकपणे मोठ्या फरकाने पराभव केला होता. पराभवाच्या या अखंड मालिकेनंतरही बाळा भेगडे आणि गणेश भेगडेंना भाजपने प्रदेशवर पुन्हा संधी दिल्याने त्याची खमंग चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.