बडा भाई अन् छोटा भाईने मध्य प्रदेशची वाट लावली; जोतिरादित्य शिंदेंचा हल्लाबोल - Bada bhai and chhota bhai ruined Madhya Pradesh says Scindia | Politics Marathi News - Sarkarnama

बडा भाई अन् छोटा भाईने मध्य प्रदेशची वाट लावली; जोतिरादित्य शिंदेंचा हल्लाबोल

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. मिनी विधानसभा ठरणाऱ्या या निवडणुकांच्या प्रचाराला आता जोर चढला आहे. 

भोपाळ : मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. जोतिरादित्य शिंदे हे समर्थक आमदारांसह काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यामुळे या निवडणुका होत आहेत. शिंदे यांनी आता जोरदार प्रचार सुरू केला असून, त्यांनी आज काँग्रेसमधील जुने सहकारी कमलनाथ आणि दिग्विजयसिंह यांच्यावर हल्लाबोल केला. 

शिंदे यांनी बिओरा आणि बडनवार येथे जाहीर सभा घेतल्या. या वेळी त्यांनी कमलनाथ आणि दिग्विजय यांच्या उल्लेख बडा भाई अन् छोटा भाई असा केला. ते  म्हणाले की, बडा भाई-छोटा भाईने वल्लभ भवन (मंत्रालय) हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनवले. कमलनाथ यांना जगातील सर्वांत मोठा उद्योगपती असे म्हटले जाते. यामुळे मला वाटले होते की, ते राज्यात उद्योग आणतील. प्रत्यक्षात मात्र, त्यांनी राज्यातील उद्योगच बाहेर घालवले. 

कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असताना एका पोलीस अधीक्षकाची सहा महिन्यांत पाच वेळा बदली करण्यात आली होती, असा आरोप शिंदे यांनी केला. ते म्हणाले की, त्यांच्या काळात दारु आणि खाण उद्योग मात्र, राज्यात वाढले. एका मंत्र्याने त्यावेळी काँग्रेस अध्यक्षांकडे कमलनाथ यांच्याविरोधात तक्रारही केली होती. परंतु, 15 महिने कमलनाथ (कमलनाथ) मुख्यमंत्री बनले आणि छोटा भाई (दिग्विजयसिंह) हे सुपरसीएम बनले आणि त्यांनी राज्याची वाट लावली.  

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण आता पुन्हा तापू लागले आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहे. या निवडणुका 9 नोव्हेंबरला  होत आहेत. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली आहे. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून ते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.  

जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आता राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील तब्बल 16 ग्वाल्हेर भागातील आहेत. शिंदे यांच्या ग्वाल्हेर या बालेकिल्ल्यात कमलनाथ यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले होते. 

Edited by Sanjay Jadhav 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख