बबनदादांनी जयंत पाटलांना फोन केला... पण `ऑपरेशन लोटस`ची चर्चा जोरात

माढ्याचे आमदार बबनदादाद शिंदे (Babandada Shinde) हे ईडीच्या भीतीमुळे भाजपमध्ये जाण्याची शक्यता
Babanrao Shinde
Babanrao ShindeSarkarnama

पुणे : सत्ताबदलानंतर राज्यात स्थानिक समीकरणे देखील बदलू लागली आहेत. भाजपने शिवसेनेला धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील बडे नेते फोडण्याची तर स्पर्धा सुरू झाली नाही ना, अशी शंका आता येऊ लागली आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) आणि माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज दिल्लीत भेट घेतल्यानंतर याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांना आज मुंबईत या दोन नेत्यांबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी हे दोन्ही नेते त्यांच्या कामासाठी फडणविसांना भेटले होते. विविध पक्षांचे नेते एकमेकांना भेटत असतात. त्यामागे राजकीयच अर्थ असतो असे नाही, असेही अजितदादांनी सांगितले. तसेच फडणविसांची भेट झाल्यानंतर बबनदादांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन करून कामासाठी फडणवीस यांना भेटल्याचे सांगितले, याकडेही अजित पवार यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले. खुद्द बबनदादा यांनीही या भेटीत भाजप प्रवेशाचे काही ठरले नसल्याचे स्पष्ट केले.

मात्र राजकारणी मंडळी जे सांगतात ते तसेच करतात, असे अजिबात नाही. शिंदे यांच्यासोबत राजन पाटील हे देखील फडणवीस यांना भेटले. त्यांना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारला असता तसे असेल तर तुम्हाला ते कळेलच की, असे उत्तर दिले. त्यांनी भाजप प्रवेशाची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली नाही, असेही या उत्तरातून दिसून येते.

माढा विधानसभा मतदारसंघात बबनदादा यांची ताकद आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला तरी ते पुन्हा निवडून येऊ शकतात, याची खात्री भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. बबनदादा यांच्यासोबत त्यांचे बंधू आमदार संजय शिंदे हे देखील भाजपसोबत येऊ शकतात. त्यामुळे एका राजीनाम्याच्या बदल्यात दोन आमदारांचे समर्थन भाजपला मिळणार आहे. शिंदे यांच्याविरोधात ईडीची कारवाई देखील सुरू आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यातून दिलासा मिळण्याचा होरा शिंदे यांना असावा.

राजन पाटील यांना भाजपकडून विधान परिषदेवर पाठविण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. त्यासाठीची मोर्चेबांधणी पाटील यांनी फडणवीस यांच्यासोबत केली नाही ना, असेही आता बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात राजकीय उलथापालथ झाल्यास नवल नाही. त्यामुळे बबनदादा यांनी जयंत पाटील यांना कितीही फोन करून सांगितले असले तरी प्रत्यक्षात आगामी काळात काय घडेल, हे सांगता येत नाही.

दरम्यान, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मध्यस्थीने दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीसाठी खासदार निंबाळकर यांनी मोठी भूमिका निभावल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com