अखेर भाजपचं ठरलं! येडियुरप्पांचं राजकीय पुनर्वसन राज्याबाहेर

मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले येडियुरप्पा यांचे राजकीय पुनर्वसन राज्याबाहेर केले जाणार आहे.
b s yediyurappa may be nomminated as governor of telangana
b s yediyurappa may be nomminated as governor of telangana

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेले येडियुरप्पा यांचे राजकीय पुनर्वसन राज्याबाहेर केले जाणार आहे. येडियुरप्पांची तेलंगणच्या राज्यपालपदी नियुक्ती केली जाणार असून, याबाबत आठवडाभरात घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येडियुरप्पांची तेलंगणच्या राज्यपालपदी नियुक्ती केली जाणार आहे. विद्यमान राज्यपाल तमिलसाई सौंदरराजन यांच्याकडे पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपाल म्हणूनही जबाबदारी आहे. पुदुच्चेरीच्या पूर्णवेळ नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी सौंदरराजन यांनी केंद्र सरकारकडे केली होती. लवकरच केंद्र सरकार याविषयी निर्णय घेऊन सौंदरराजन यांना पुदुच्चेरीचे पूर्णवेळ नायब राज्यपाल नेमणार आहे. यानंतर रिक्त झालेल्या तेलंगणच्या राज्यपालपदी येडियुरप्पांची वर्णी लागणार आहे.  

येडियुरप्पांनी 26 जुलैला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मोठा प्रश्न भाजप नेतृत्वासमोर होता. येडियुरप्पांना त्यांचे पुत्र व पक्षाचे उपाध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांच्यामुळे राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा होती. तसेच, विजयेंद्र यांना नव्या मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले नव्हते. येडियुरप्पांनी आग्रह धरूनही नेतृत्वाने विजयेंद्र यांना डावलले होते. यामुळे येडियुरप्पा नाराज असल्याची चर्चा आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. 

राज्य सरकारवर येडियुरप्पांचा प्रभाव पाहता त्यांना राज्याबाहेरच पाठवणे सोईस्कर ठरेल, असा नेतृत्वाचा कयास आहे. यामुळे राज्यपाल म्हणून येडियुरप्पांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. येडियुरप्पांनी आधीच राज्याबाहेर जाण्यास नकार दिला आहे. परंतु, पक्ष संघटनात्मक बदलही आता सुरू झाले आहेत. यात त्यांच्या पुत्रावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. असे घडल्यास येडियुरप्पा राज्यपालपद स्वीकारण्यास तयार होतील, असे सूत्रांनी सांगितले. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com