...तर बिहारमध्ये स्वबळावर लढणार; काँग्रेसचा पवित्रा - avinash pandey says congress is fully prepared to contest all seats in bihar | Politics Marathi News - Sarkarnama

...तर बिहारमध्ये स्वबळावर लढणार; काँग्रेसचा पवित्रा

वृत्तसंस्था
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप आणि काँग्रेसकडून आघाड्यांचे गणित जुळवण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या कहर वाढत असताना बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाच्या आघाडीविरोधात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस यांची आघाडी असे चित्र दिसत आहे. मात्र, या आघाडीचे गणित जुळत नसल्याने काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेतला आहे. 

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे बिहारमधील विधानसभा निवडणूक राजकीय पक्षांच्या व्हर्च्युअल प्रचारामुळे गाजणार आहे. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या घोषणेसोबतच बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  

यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीवेळी सहकारी असलेले पक्ष आता विरोधात मैदानात आहेत. मागील वेळी लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जेडीयू आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र होते. त्यावेळी भाजपने लोकजनशक्ती पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्षासोबत आघाडी केली होती. मागील निवडणुकीच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा विजय झाला होता. या विजयानंतर काही महिन्यांमध्येच नितीश यांनी लालूंच्या पक्षाची साथ सोडत भाजपसोबत आघाडी केली होती. यामुळे विरोधी बाकांवरील भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष सत्तेत आला होता. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. आधी या महाआघाडीचे घटक असलेले जितनराम मांझी आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) गेले आहेत. याचवेळी एनडीएमधील लोक जनशक्ती पक्षाने वाढीव जागा मिळाव्यात म्हणून आग्रह धरला आहे. आता काँग्रेस आणि आरजेडी यांच्यातही जागा वाटपावरुन तिढा निर्माण झाला आहे. 

याविषयी बोलताना काँग्रेसच्या छाननी समितीचे अध्यक्ष अविनाश पांडे म्हणाले की, बिहारमध्ये सर्वच 243 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. आरजेडीसोबत जागा वाटपासंदर्भात योग्य तोडगा निघाल्यास आम्ही त्यांच्यासोबत निवडणूक लढवू. अन्यथा इतर पर्याय काँग्रेसमोर आहेत. 

Edited by Sanjay Jadhav
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख