वैशाली नागवडे, कांचन कुल यांच्या कामात चुरस - Attention to the work of Vaishali Nagwade Kanchan Kul | Politics Marathi News - Sarkarnama

वैशाली नागवडे, कांचन कुल यांच्या कामात चुरस

रमेश वत्रे
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

एकाच तालुक्यातील एकाच जिल्हा परिषद गटातील दोघी असल्याने कामात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

केडगाव ( जि.पुणे ) : भाजपने दौंड तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रीत केलेले दिसते. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपच्या महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षाच्या दोन महिला जिल्हाध्यक्षा दौंड तालुक्यात असल्याने आता कामात चुरस पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे व कांचन कुल या दोघीही राहु-खामगाव या एकाच जिल्हा परिषद गटात राहतात. कांचन कुल यांची राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे. त्यांचे सासरे सुभाष कुल, सासू रंजना कुल यांनी विधानसभेत काम केलेले आहे. तर पती सुध्दा आमदार आहेत. स्वतः कांचन कुल यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. वैशाली नागवडे यांना राजकीय पार्श्वभूमी काहीही नसताना त्यांनी जिल्हा व राज्य पातळीवरील पदांवर काम केलेले आहे. 

पंचायत समिती सदस्य, पंचायत राज समितीच्या राज्यअध्यक्षा, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षा, महानंद दूधच्या अध्यक्षा अशा पदावर काम केलेले आहे. पवार कुटुंबियांशी एकनिष्ठ ही नागवडे यांची जमेची बाजू आहे. किंबहुना एकनिष्ठतेमुळे त्यांना मोठी पद मिळत गेली. रूपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्षपद मिळाले तेव्हाही त्यांचे नाव चर्चेत होते. कामाचा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. विविध सामाजिक विषयावर त्यांनी आवाज उठविला आहे. त्याची सरकारला दखल घ्यावी लागलेली आहे. 

एकाच तालुक्यातील एकाच जिल्हा परिषद गटातील दोघी असल्याने कामात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. ही चुसर कशी असेल हे पाहणे औस्तुक्याचे राहिल. कुल यांच्या पक्षांकडे केंद्रात सत्ता आहे तर नागवडे यांच्या पक्षाकडे राज्यातील सत्ता आहे. कांचन कुल यांच्या मागे राहुल कुल यांची ताकद असेल तर वैशाली नागवडे यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळे यांचे पाठबळ आहे. जिल्ह्यात महिलांचे विविध प्रश्न आहे. यात खासदार सुप्रिया सुळे यांचेही जातीने लक्ष असते. कांचन कुल यांनाही महिलांना भेडसावणा-या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे लागेल. पुणे जिल्ह्यात बचत गटातील महिलांचे कार्य सध्या थंडावलेले दिसत आहे, त्यांना चालना देणे, महाविद्यालयीन युवतींच्या समस्या आहेत. 

महामार्गावर अनेक बसथांब्याच्या ठिकाणी महिलांसाठी शौचालय नाहीत. विधवा, परितक्त्या महिलांना कागदपत्रांअभावी शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. रेल्वेत महिलांसाठी आरक्षित डब्यांची संख्या कमी असल्याने त्यांची कुचंबना होत आहे. पुणे जिल्हा प्रगत असला तरी जिल्ह्यात महिलांमध्ये हिमोग्लोबीन व कॅलशियमच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उदभवत आहेत. महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. या समस्यांवर दोन्ही पक्षातील पदाधिका-यांनी काम करणे महिलांना अपेक्षित आहे.

Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख