दया नायक अॅक्शन मोडमध्ये; मुख्यंत्र्यांसह शरद पवारांना धमकावणारा दाऊदचा कथित हस्तक गजाआड

महाराष्ट्रातील नेत्यांना कॉल करुन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने अखेर पकडले आहे.
ATS arrests man who allegedly making threatening calls to maharashtra leaders
ATS arrests man who allegedly making threatening calls to maharashtra leaders

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्‍मीरशी  करुन वाद ओढवून घेतला आहे. यानंतर तिच्यावर टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकी देण्यात आली होती. ही धमकी देणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कथित हस्तकाला राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोलकत्यातून अटक केली आहे. या आरोपीनेच मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांना दाऊदच्या नावाने धमकी दिल्याचे समोर आले आहे. 

पलाश बोस असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. तो 15 वर्षे दुबईत होता. तो काही वर्षांपूर्वी परत आला असून, कोलकत्यात राहत होता. त्याने नेत्यांना कॉल करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचे दुबईत कोणत्या गँगशी संबंध होते का याचाही शोध घेण्यात येत आहे. याच आरोपीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानीही धमकीचे दूरध्वनी केल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणापासून राज्यातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकार आणि भाजपमध्ये जुंपली आहे. यात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे विरोधकांना उत्तर देण्यात आघाडीवर आहेत. यावरुन अनेक वेळा ते अडचणीतही आले आहेत. सुशांत प्रकरणात कंगनाने उडी घेतल्यानंतर तिच्यात आणि संजय राऊत यांच्यात जुंपली होती. अजूनही हा वाद शमलेला नाही. 

या वादामुळे  कंगनाच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर संजय राऊत यांना धमकी दिली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू होता. या पथकाने अखेर त्या व्यक्तीचा माग काढण्यात यश मिळवले. त्यावेळी तो कोलकता येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला शुक्रवारी कोलकत्यातून अटक केली. त्याला कोलकत्यातील न्यायालयात हजर करून ट्रान्झिस रिमांडद्वारे मुंबईत आणले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

पोलिसांना पकडलेला आरोपी हा दुबईत व्यायामशाळेत प्रशिक्षक म्हणून काम करीत होता. याच आरोपीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानीही धमकीचे दूरध्वनी केल्याचे चौकशीत कबूल केले आहे. त्याने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगून धमकी दिली होती. त्यासाठी त्याने दुबईतील मोबाईल क्रमांकाचा वापर केला. त्याच्याकडून दोन मोबाईल संच, एक भारतीय सिम कार्ड व दुबईतील तीन सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com