गोंधळात गोंधळ : मतदार ९० अन् मतदान झाले १८१; निवडणूक आयोगाकडून ६ अधिकारी निलंबित

मतदान केंद्रावर नोंदणी असलेल्या मतदारांच्या दुप्पट मतदान झाल्याने निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
in assam polling booth 90 voters 181 votes
in assam polling booth 90 voters 181 votes

गुवाहाटी : विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आसाममध्ये १ एप्रिलला मतदान झाले. यात एका मतदान केंद्रावरील मतदानात मोठा फरक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दिमा हसाओ जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर ९० मतदार असताना तब्बल १८१ मतदान झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने सहा अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. 

हफलाँग विधानसभा मतदारसंघात हे मतदान केंद्र आहे. या मतदारसंघात मागील वेळी २०१६ मध्ये भाजपचे बीरभद्र हगजेर हे निवडून आले होते. आता या मतदारसंघात ७४ टक्के मतदान झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग संबंधित मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेणार आहे. या केंद्रावर ९० मतदारांची नोंदणी असतानाही  १८१ मतदान झाल्याच्या प्रकाराची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी सहा अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. राज्यात याआधी एका मतदान केंद्रात पुन्हा मतदान घेण्याचा आदेश आधीच आयोगाने दिला आहे. 

मतदान झाल्यानंतर भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम

पाथरकांडी येथील राताबारी विधानसभा मतदारसंघासाठी १ एप्रिलला मतदान झाले. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम एका गाडीतून नेली जात होती. याची माहिती मिळताच काँग्रेस आणि एआययूडीएफ या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची गाडी बंद पडल्याने त्यांनी एका गाडीला लिफ्ट मागितल्याचे सांगितले. नंतर ही गाडी भाजप उमेदवाराची असल्याचे निदर्शनास आल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

या प्रकरणी निवडणूक आयोगाने म्हटले होते की, निवडणूक विषयक वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी आणि इतर तीन अधिकाऱ्यांवर या प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी आयोगाच्या विशेष निरीक्षकांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. 

ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या अधिकाऱ्यांची गाडी काल बंद पडली. ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या इतर गाड्यांच्या ताफ्यापासून ही गाडी एकटी मागे पडली होती. रहदारी आणि खऱाब हवामानामुळे हे घडले. त्यांची गाडी बंद पडल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दुसरी व्यवस्था होण्याआधीच या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या गाडीला लिफ्ट मागितली, असे आयोगाने स्पष्ट केले होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाडीला अडवणाऱ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याच आले आहेत. मतदान यंत्रे घेऊन जाणाऱ्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर ईव्हीएमची आयोगाने तपासणी केली. यात ईव्हीएमशी काहीही छेडछाड झाली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष वारंवार भाजपला लक्ष्य करीत असतात. भाजपकडून ईव्हीएममध्ये फेरफार केले जात असल्याचा आरोप विरोधक नेहमी करीत आहेत. आता निवडणूक झाल्यानंतर भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम सापडल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. यात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय विरोधक व्यक्त करीत आहेत. 

आसाममध्ये 1 एप्रिलला विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. राज्यातील १३ जिल्ह्यांतील एकूण ३९ मतदारसंघात काल (ता.१) मतदान झाले. यात ७४.७६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राज्यात तिसऱ्या व अंतिम फेरीतील मतदान ६ एप्रिलला होणार असून, मतमोजणी व निकाल २ मे रोजी जाहीर होईल. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com