सावधान : ब्लॅक, व्हाईट, यलोनंतर आता आणखी एक नवीन फंगस; 8 रुग्ण सापडले

कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस हा आजार होत असल्याने चिंता वाढू लागली आहे. यातच नवनवीन फंगसचा संसर्ग समोर येऊ लागला आहे.
aspergillosis fungal infection found in covid recovered patients in gujarat
aspergillosis fungal infection found in covid recovered patients in gujarat

नवी दिल्ली : कोरोनातून (Covid 19) बरे झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस (Black Fungus) हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. यातच देशात काही दिवसांपूर्वी व्हाईट फंगस (white fungus) सापडला होता. नंतर त्याहीपेक्षा धोकादायक यलो फंगसही (Yellow Fungus) आढळला होता. आता अॅस्परगिलोसिस (Aspergillosis) हा नवीन फंगस सापडला असून, या आजाराचे 8 रुग्ण सापडले आहेत. 

महाराष्ट्र, गुजरातसह देशांतील अनेक राज्यांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. या आजारावर वेळीच उपचार न घेतल्यास जीवावर बेतण्याची भीती आहे. रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे या आजाराचा समावेश आता इतर साथींच्या आजारामध्ये केला आहे. त्यानुसार साथरोग कायद्यानुसार उपाययोजना राज्यांना केल्या आहेत. 

आता अॅस्परगिलोसिस हा नवीन फंगस समोर आला आहे. गुजरातमधील बडोद्यात या आजाराचे 8 रुग्ण सापडले आहेत. हा ब्लॅक फंगससारखाच प्रकार असून, कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये तो आढळत आहे. या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतिकारशक्ती कमी झालेल्या आहे अशा व्यक्तींमध्ये या फंगसचा संसर्ग होतो. हा आजार दुर्मिळ असून, तो आता कोरोना रुग्णांमध्ये दिसून येऊ लागला आहे. हा आजार जीवघेणा नसला तरी वेळीच उपचार न झाल्यास मृत्यू होऊ शकतो. 

काही दिवसांपूर्वी ब्लॅक, व्हाईटनंतर यलो फंगस समोर आला होता. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये यलो फंगसचा पहिला रुग्ण सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकाच रुग्णाला ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगसचा संसर्ग झाला आहे. यलो फंगस हा पाली आणि इतर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आढळून येतो. परंतु, आतापर्यंत तो मानवामध्ये आढळला नव्हता. या रुग्णाला अशक्तपणा, चक्कर येणे, ताप आणि सर्दी अशी लक्षणे आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही लवकरच हा रुग्ण बरा होईल, अशी माहिती उपचार करणारे डॉक्टर बी.पी.त्यागी यांनी दिली होती. 

व्हाईट फंगसचा पहिला रुग्ण बिहारमध्ये सापडला होता. हा आजार म्युकरमायकोसिसपेक्षा धोकादायक असल्याचे तज्ञांचे मत आहे. आतापर्यंत बिहारमध्ये व्हाईट फंगसच्या रुग्णांमध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे. यानंतर हा व्हाईट फंगस इतर राज्यांतही पसरू लागला आहे. संसर्गजन्य विषाणूप्रमाणे ते आणखी धोकादायक ठरू शकतो, अशी माहिती तज्ञांनी व्यक्त केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com