मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांसोबत सेल्फी का नाही? : आशिष शेलारांचा चिमटा - Ashish Shelar Questions NCP Over Potholes on Mumbai Goa Highway | Politics Marathi News - Sarkarnama

मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांसोबत सेल्फी का नाही? : आशिष शेलारांचा चिमटा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

भाजप सरकारच्या काळात राष्ट्रवादीने खड्ड्यांसोबत सेल्फी काढा, असे आंदोलन केले होते. यावेळी मुंबईसह महाराष्ट्रभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले तर नाहीच, शिवाय कोकणात जाणारा अख्खा रस्ता उखडून गेला आहे. मग राष्ट्रवादी आंदोलन का करत नाही?  असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे

मुंबई  : मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रात खड्ड्यांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर हा 'स्तुत्य उपक्रम' राबवून आपल्या सरकारच्या चेहऱ्यासमोर आरसा का धरीत नाही? असा सवाल भाजप नेते व आमदार आशीष शेलार यांनी केला आहे.

भाजप सरकारच्या काळात राष्ट्रवादीने खड्ड्यांसोबत सेल्फी काढा, असे आंदोलन केले होते. यावेळी मुंबईसह महाराष्ट्रभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले तर नाहीच, शिवाय कोकणात जाणारा अख्खा रस्ता उखडून गेला आहे. मग राष्ट्रवादी आंदोलन का करत नाही? कोकणातील लोकप्रतिनिधी, चाकरमानी यांचा आवाज सरकारला ऐकू येत नाही का? असे म्हणत आशीष शेलार यांनी खड्ड्यांबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्रही लिहिले आहे.

मुंबई-गोवा महामार्ग पनवेलपासून चिपळूणपर्यंत पूर्णपणे उखडून गेलेला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या रस्त्यावरील नव्या पुलांसह सर्व रस्त्यावर डांबर शिल्लक राहिलेली नाही. महामार्गावर सर्वत्र खड्डे व खडी असल्याचे शेलार यांनी पत्रात म्हटले आहे.

आता तरी खड्डे बुजवावेत!
खड्ड्यांमुळे आता परतीच्या प्रवासात असलेल्या चाकरमान्यांचा प्रवासात कंबरेचे आजार होतील की काय, अशी भीती वाटते आहे. किमान आता तरी रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख