गुड न्यूज : राज्यातील दोन लाख शेतकरी वीजबिलांतून थकबाकीमुक्त - around two lakh farmers of state pays electricity bill under mahavitaran scheme | Politics Marathi News - Sarkarnama

गुड न्यूज : राज्यातील दोन लाख शेतकरी वीजबिलांतून थकबाकीमुक्त

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 मार्च 2021

वीजबिलांतून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या महाकृषी ऊर्जा अभियानास शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 

मुंबई : कृषी ग्राहकांना वीजबिलांतून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणकडून महाकृषी ऊर्जा अभियान राबवले जात आहे. या अभियानाला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. राज्यात 8 लाख 6 हजार 105 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला असून, आजपर्यंत (ता. 25) 1 लाख 92 हजार 529 शेतकऱ्यांनी मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा केला आहे. यामुळे या शेतकऱ्यांनी 100 टक्के थकबाकीमुक्ती मिळवली आहे.

शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्ती देण्यासाठी एकूण थकबाकीत  66 टक्‍क्‍यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. या योजनेनुसार कृषी ग्राहकांकडे 30 हजार 693 हजार 55 लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. यापैकी पहिल्या वर्षात 50 टक्के थकबाकी भरल्यास वीजबिल थकबाकीमुक्ती मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना आहे. आता राज्यातील 1 लाख 92 हजार 529 शेतकऱ्यांनी चालू व थकीत वीजबिलांपोटी 330 कोटी 42 लाख रुपयांचा भरणा करून वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळविली आहे. 

या शेतकऱ्यांनी सुधारित मूळ थकबाकीच्या 50 टक्के रकमेचा एकरकमी भरणा केला आहे, या शेतकऱ्यांनी एकूण 255 कोटी 2 लाख रुपयांसह चालू वीजबिलांच्या 75 कोटी 40 लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांना सुधारित मूळ थकबाकीमध्ये 255 कोटी 2 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. 

यामध्ये पुणे प्रादेशिक विभाग आघाडीवर असून, विभागात सर्वाधिक 84 हजार 455 शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. यानंतर कोकण प्रादेशिक विभागात 68 हजार 67, नागपूर प्रादेशिक विभाग 30 हजार 219 आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील 9 हजार 788 थकबाकीमुक्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे, या सर्व शेतकऱ्यांना महावितरणकडून थकबाकीमुक्ती सन्मानपत्रही दिले जात आहे.

याविषयी बोलताना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल म्हणाले की, थकीत वीजबिलांतून मुक्ती व परिसरातील कृषी वीजयंत्रणेचा विकास साधण्यासाठी महाकृषी ऊर्जा अभियान राबवले जात आहे. यामध्ये सर्व थकबाकीदार कृषी ग्राहकांनी सहभागी व्हावे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख