मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 'टाईम्स नाऊ' वृत्तवाहिनीच्या व्यवस्थापकीय संपादिका नाविका कुमार यांनी 18 जानेवारीला कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमावरुन गोस्वामी यांनी नाविका यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली आहे. यामुळे अर्णब विरुद्ध एकेकाळच्या सहकारी असलेल्या नाविका असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती.
या प्रकरणी नाविका कुमार यांनी 'टाईम्स नाऊ' वृत्तवाहिनीवर 18 जानेवारीला कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बदनामी करण्यात आल्याचा आरोप करीत गोस्वामींनी नाविका यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी त्यांनी नाविका यांना 51 पानांची कायदेशीर नोटीस बजावली आहे. यात म्हटले आहे की, नाविका यांनी तथ्यांची मोडतोड, पुनर्रचना आणि त्यांचा गैपवापर केला. मुंबई पोलिसांनी बनावट टीआरपी प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रातील कागदपत्रांचा त्यांनी यासाठी त्यांनी वापर केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही त्यांनी या कागदपत्रांचा वापर करण्यात आला.
नाविका यांचा जळफळाट होत आहे कारण रिपब्लिक टीव्हीच्या यशाची सामना करण्याची क्षमता त्यांच्यात नाही. यासाठी त्यांनी बदनामीकारक कार्यक्रम सादर केला. गोस्वामींच्या विरोधात न्यायालयीन खटला सुरू होण्याआधीच मुंबई पोलिसांच्या आरोपपत्राच्या आधारे नाविका यांनी बदनामीची मोहीम सुरू केली.
गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयचा वापर व्यवसायाच्या वाढीसाठी केल्याचे समोर आले आहे. गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील स्वत:च्या वजनाचा अभिमानाने उल्लेख केला होता.
Edited by Sanjay Jadhav

