arnab goswami dares chief minister uddhav thackeray again after release
arnab goswami dares chief minister uddhav thackeray again after release

उद्धव ठाकरे, द गेम हॅज जस्ट बिगन; गोस्वामींचे मुख्यमंत्र्यांना सुटकेनंतर थेट आव्हान

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची कारागृहातून सुटका झाली आहे. सुटका झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी हे तळोजा कारागृहात होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. त्यामुळे गोस्वामी यांची काल तळोजा कारागृहातून सुटका झाली होती. सुटका होताच पुन्हा गोस्वामी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.  

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून ४ नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. 

गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबरला गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान, गोस्वामी यांनी अलिबाग सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर अलिबाग न्यायालयाला चार दिवसांत निर्णय देण्याचेही उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. 

याप्रकरणी गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत गोस्वामी यांची तातडीने सुटका होईल हे पाहण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले होते. आज सर्वोच्च न्यायालयात गोस्वामींच्या बाजून हरीश साळवे यांनी तर महाराष्ट्र सरकारच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली होती. 

गोस्वामी यांची काल (ता.११) रात्री तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर गोस्वामी यांची सुटका झाली आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर गोस्वामी यांनी मोटारीत बसून सर्वांना विजयाची खूण केली होती. ते म्हणाले की, हा भारतीय नागरिकांचा विजय आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा ऋणी आहे. भारत माता की जय! 

सुटका झाल्यानंतर गोस्वामी यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ‘द गेम हॅज जस्ट बिगन’ असे थेट आव्हान दिले. गोस्वामी यांनी जय महाराष्ट्रचा नाराही दिला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे माझे आता ऐका. तुम्ही हरला आहात. तुमचा पराभव झाला आहे. उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या व खोट्या केसमध्ये अडकवून अटक केलीत. माझी माफीही तुम्ही मागितली नाहीत. मी कारागृहातूनही न्यूज चॅनेल चालवू शकतो आणि तुम्ही काहीही करु शकत नाही.

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. आता पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com