लष्कर धावलं महाराष्ट्राच्या मदतीला; पूरग्रस्त भागात जवानांचं 'ऑपरेशन वर्षा'
Army teams deployed in flood affected areas of Maharashtra

लष्कर धावलं महाराष्ट्राच्या मदतीला; पूरग्रस्त भागात जवानांचं 'ऑपरेशन वर्षा'

महाराष्ट्रात रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूरसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडत आहे.

पुणे : महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. अनेक नद्यांना पूर आल्याने गावे पाण्याखाली गेली आहेत. तर दरड कोसळून 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भयानक पूरस्थितीतून नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहचविण्यासाठी तसेच इतर आवश्यक मदत देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह लष्कर व 'एनडीआरएफ'चे जवानही सरसावले आहेत. लष्कराने 'ऑपरेशन वर्षा' अंतर्गत तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केलं आहे. (Army teams deployed in flood affected areas of Maharashtra)

महाराष्ट्रात रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूरसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे बहुतेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा धोका ओळखून स्थानिक प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातील एक भाग म्हणून लष्करालाही बचाव व मदत कार्यासाठी विनंती करण्यात आली होती.

त्यानुसार लष्कराने विविध ठिकाणी तातडीने 15 टीम पाठवल्या आहेत. पुण्यातील औंध मिलिटरी स्टेशन व बॉम्बे इंजिनिअर ग्रुपचे जवान रत्नागिरी, कोल्हापूर व सांगली भागात तातडीने पाठवण्यात आले आहेत. हे जवान स्थानिक प्रशासनाला बचाव व मदत कार्यात सहकार्य करत आहेत. 'पावसाचा फटका बसलेल्या ठिकाणी लष्कराकडून सर्वप्रकारची मदत केली जात आहे. लष्कर नागरिकांसोबत आहे. बचाव कार्यासह वैदयकीय मदतही पुरवली जात आहे,' असे लष्कराचे अधिकारी लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी सांगितले.   

'एनडीआरएफ'च्या जवानांचेही मदतकार्य सुरू  

राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार, 'एनडीआरएफ'च्या एकूण १४ तुकड्या विविध जिल्ह्यांत पोहचल्या आहेत. पालघर १, ठाणे २, रायगड २, रत्नागिरी ४, सिंधुदुर्ग १, सांगली १, सातारा १ तर कोल्हापूरमध्ये दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे नागपूरमध्ये दोन, रायगड जिल्हयात दोन तुकड्या बचाव कार्य करत आहेत. याशिवाय पोलादपूरसाठी एक टीम मुंबई येथून हवाई मार्गे पाठविण्यात आली आहे. याशिवाय दुपारपर्यंत एनडीआरएफच्या आठ अतिरिक्त तुकड्या भूवनेश्वर येथून आल्या आहेत. 

लष्कर व 'एनडीआरएफ'प्रमाणेच तटरक्षक दल आणि नौदलही या बचाव कार्यात सहभागी झाले आहे. तटरक्षक दल आणि नौदालाच्या प्रत्येकी दोन तुकड्या रत्नागिरी येथे लोकांच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. लष्कर व एनडीआरएफचे जवान दिवसरात्र बचाव कार्य करत असून नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. त्यामुळे अनेक लोकांना पुराच्या तडाख्यातून वाचवणे शक्य होत आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in