गांधी-नेहरू कुटुंबाचा हिशेब मागून अनुराग ठाकूर पडले तोंडघशी - anurag thakur comment on gandhi and nehru family create furor in parliament | Politics Marathi News - Sarkarnama

गांधी-नेहरू कुटुंबाचा हिशेब मागून अनुराग ठाकूर पडले तोंडघशी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

कोरोना संकटाच्या काळात केंद्र सरकारने पीएम केअर्स फंड सुरू केला आहे. या फंडाचा विरोधकांना आज सरकारकडे हिशेब मागितला. यावर अनुराग ठाकूर यांनी गांधी-नेहरू कुटुंबाचा हिशेब द्यावा, असे विधान केल्याने मोठा गदारोळ झाला. 

नवी दिल्ली : कोरोना संकटाला लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स हा फंड स्थापन केला आहे. या फंडाला चिनी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात मिळाल्याची बाब समोर आली होती. यावर विरोधकांनी सरकारला पीएम केअर्स फंडाचा हिशेब मागितला. यावर अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी नेहरू, गांधी कुटुंबाचा हिशेब मागत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून  लोकसभेमध्ये मोठा गदारोळ झाला. 

कर कायद्यातील सुधारणांशी संबंधित अध्यादेशाची जागा घेणाऱ्या विधेयकावरील चर्चेवेळी हा वाद झाला. हे विधेयक मांडण्यास काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला. यावर विधेयकातील तरतुदी करदात्यांना सवलत देणाऱ्या असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तर कोरोना संकट काळात सरकारने बनविलेल्या पीएम केअर्स फंडावर प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना उत्तर देण्याची जबाबदारी त्यांनी अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर सोपविली. मात्र, ठाकूर हे पीएम केअर्स फंडाकडून थेट गांधी-नेहरू कुटुंबावर घसरले. 

ठाकूर म्हणाले की, पीएम केअर्स फंड हा सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट असून देशातील जनतेसाठी तो बनविण्यात आला आहे. याचवेळी काँग्रेसने मात्र, गांधी कुटुंबासाठी ट्रस्ट बनविले. पंतप्रधानांच्या नॅशनल रिलिफ फंडमध्ये नेहरू आणि सोनिया गांधींना सदस्य बनविण्यात आले होते. यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. नेहरूंच्या काळात पीएम नॅशनल रिलिफ फंड बनविण्यात आला, त्याला पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून मान्यताही देण्यात आली नव्हती. पीएम केअर्स फंडाची मात्र, कायदेशीर नोंदणी झाली आहे. 

यावर संतापलेल्या काँग्रेस खासदारांनी आक्षेप घेतल्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्याआधी भाजपच्या बंगालमधील खासदार लॉकेट चटर्जी यांनी केलेल्या विधानावर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी प्रत्युत्तर देण्यासाठी बोलण्याची परवानगी मागत होते. लोकसभाध्यक्षांनी त्यांना परवानगी नाकारताना नव्या नियमानुसार जागेवर बसून बोलण्याची परवानगी असताना बोलण्यासाठी उभे राहून आणि मास्क काढून इतरांची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्यांना सभागृहाबाहेर घालविले जाईल अशी तंबी दिली. यामुळे चिडलेल्या कल्याण बॅनर्जींनी पीठासीन अधिकाऱ्यांनाच आव्हान दिले. 

तृणमूल काँग्रेसच्या कल्याण बॅनर्जींची आक्रमकता पाहून आधी शांतपणे बसून असलेले काँग्रेस खासदारही आक्रमक झाले. ठाकूर यांनी माफी मागावी यासाठी काँग्रेस खासदारांनी अध्यक्षांपुढील हौद्यात धाव घेतल्यामुळे चार वेळा सभागृह तहकूब होऊन कामकाज ठप्प झाले. लोकसभाध्यक्षांनी कारवाई करण्याची तंबी देऊनही सदस्यांना फरक पडला नाही. तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी तर पीठासीन अधिकाऱ्यांनाच कारवाईसाठी आव्हान दिले. यामुळे गोंधळात आणखी भर पडली. त्यामुळे लोकसभेत आज काहीही कामकाज होऊ शकले नाही. अखेर, अनुराग ठाकूर यांनी कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असे म्हणत खेद व्यक्त केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख