शेतकऱ्यांप्रमाणे किती उद्योजकांनी आत्महत्या केल्या ? अण्णा हजारेंचा सवाल 

शेतकऱ्यांप्रमाणे किती उद्योजकांनी आत्महत्या केल्या ? अण्णा हजारेंचा सवाल 

भुवनेश्‍वर : गेल्या 22 वर्षात 12 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असा दावा करतानाच देशात किती उद्योगपतींनी आत्महत्या केली याची आकडेवारी आपणास मिळेल का ? असा संतप्त सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केला आहे. 

देशातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि लोकपालच्या मुद्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्लीत आपण आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. हजारे म्हणाले, "" देशात लाखो शेतकरी आत्महत्या करतात हे भयावह चित्र आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही त्यामुळे त्यांच्या प्रश्‍नाकडे सरकारने लक्ष वेधण्यासाठी पुन्हा आंदोलन करावे लागणार आहे.'' 

ओरिसाच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या अण्णा हजारे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, "केंद्रातील आणि राज्यातील सरकारांची धोरणे उद्योजकांच्या बाजूची तर शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न ते पाहतही नाहीत आणि ऐकतही नाहीत. मोदी सरकारनेही शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. 2014 पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना कोणती आश्‍वासने दिली होती. ती आश्‍वासने गेल्या तीन वर्षात पूर्ण झाली का ? "

" शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव का दिला जात नाही याचे उत्तर सरकारकडे नाही. शेतकऱ्यांना खोटी आश्‍वासने देऊन ते सत्तेवर आले; मात्र सत्तेवर येताच त्यांना शेतकऱ्यांचाच विसर पडला आहे. सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी आपला आवाज बुलंद केला पाहिजे. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी लोकपालची अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासनही सरकारने दिले आहे त्याचे काय झाले ? "  असा सवाल करून अण्णा म्हणाले, की येत्या फेब्रुवारी महिन्यात या दोन महत्वाच्या मुद्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच आंदोलन करण्यात येणार आहे.  

Related Stories

No stories found.