अनिल देशमुखांना समन्सही मिळालं नाही अन् ते दिल्लीलाही गेले नाहीत! - anil deshmukh in not in delhi says lawyer inderpal singh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

अनिल देशमुखांना समन्सही मिळालं नाही अन् ते दिल्लीलाही गेले नाहीत!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 जुलै 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्त वसुली संचालनालयाने तिसरे समन्स बजावले आहे. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) तिसरे समन्स (Summon) बजावले आहे. देशमुखांना 'ईडी'च्या कार्यालयात 5 जुलैला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच,  देशमुख हे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दिल्लीला गेल्याचीही चर्चा सुरू होती. यावर त्यांच्या वकिलांनी खुलासा अखेर केला आहे. 

देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग म्हणाले की, अनिल देशमुख दिल्लीला गेले नाहीत. आज सकाळीच मी त्यांना भेटलो. अद्याप तरी देशमुख यांच्या नावाने ईडीचे तिसरे समन्स मिळालेले नाही. इन्कम टॅक्स रिटर्न्स आणि इतर काही माहिती छापा टाकला त्यावेळीच ईडीचे अधिकारी घेऊन गेले आहेत. तरीही ईडीने काही कागपत्रांची मागणी केल्यास आम्ही ती द्यायला तयार आहोत. देशमुखांना या वेळी तिसरे समन्स येईल आणि ऋषिकेश देशमुख यांना दुसरे समन्स येईल. याआधी ऋषिकेश देशमुख यांना एक समन्स आलेले आहे. 

हेही वाचा : मुख्यमंत्रिपदी निवड झाली अन् पुष्करसिंह धामी म्हणाले, चॅलेंज स्वीकारले! 

ईडीने यापूर्वी देशमुखांना दोन समन्स बजावली होती. त्याला त्यांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर दिले होते. ईडीला तपासात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी टि्वटही केले होते. देशमुख यांनी त्यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी याचिका केली आहे. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी देशमुख यांचे वकील अमित देसाई यानी युक्तिवाद केला होता. मात्र, त्यांचा युक्तिवाद पूर्ण झालेला नाही. त्यामुळे देशमुख यांच्या याचिकेवर आता सोमवारी (ता.५)  सुनावणी होणार आहे.

देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडीच्या विशेष न्यायालयाने येत्या ६ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विशेष करून बदल्यांमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भूमिका होती, असे संजीव पलांडे याने सक्त वसुली संचलनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात सांगितले आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूर व वरळी  येथील घराची ईडीने झाडाझडती घेतली होती.  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख