गुप्तेश्वर पांडेंना यामुळेचं भाजपनं तिकिट नाकारलं..अनिल देशमुखांचा टोला - Anil Deshmukh criticizes BJP on Gupteswar Pandey ticket | Politics Marathi News - Sarkarnama

गुप्तेश्वर पांडेंना यामुळेचं भाजपनं तिकिट नाकारलं..अनिल देशमुखांचा टोला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

भाजपचे नेते पांडेंचा प्रचार करतील का, या प्रश्नाच्या भीतीपोटी भाजपने पांडे यांचं तिकीट नाकारलं असावं.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आक्रमक भूमिका घेणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना भाजपकडून तिकिट मिळण्याची शक्यता होती. पण भाजपने या मतदारसंघाच दुसऱ्याच उमेदवार जाहीर केल्यानं पांडे यांच्या पदरी निराशा आली आहे. भाजपन परशुराम चतुवेर्दी यांना बक्सरमधून तिकिट दिलं आहे. त्यामुळे जेडीयू आणि भाजपनं पांडे यांना तिकिट नाकारून डच्चू दिल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे.

पांडे यांना भाजपनं का तिकिट नाकारलं असा प्रश्न सध्या राजकीय क्षेत्रात विचारला जात आहे. यावर गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर निशाना साधला आहे. पांडे विधानसभेची निवडणूक लढविणार अशी चर्चा होत असताना भाजप त्यांचा प्रचार करणार का असा प्रश्न त्यावेळी विचारण्यात येत होता. 

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले,"गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट देणं हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही असा प्रश्न विचारला होता की भाजपचे नेते पांडेंचा प्रचार करतील का, या प्रश्नाच्या भीतीपोटी भाजपने पांडे यांचं तिकीट नाकारलं असावं." अनिल देशमुख हे 'एएनआय'शी बोलत होते. 

पांडे हे मूळचे बक्सर भागातील असल्याने त्यांना तेथून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र, तेथील दोन्ही मतदारसंघ जागा वाटपात भाजपकडे गेल्याने जेडीयूने त्यांना तिकिट नाकारले होते. सुशांत मृत्यू प्रकरणात बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती.

त्यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली होती. त्यांचा अर्ज तातडीने राज्य सरकारने मंजूर केला होता. मुख्यंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत त्यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. नितीशकुमार यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला होता. सुशांत प्रकरणी त्यांनी घेतलेली भूमिका अखेर त्यांच्यासाठी लाभदायी ठरल्याचे चित्र होते.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुप्तेश्वर पांडे हे मूळचे बक्सरमधील आहेत. त्यामुळे त्यांना बक्सर भागातील बक्सर आणि ब्रह्मपूर या मतदारसंघांतून उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. मात्र, हे दोन्ही मतदारसंघ जागा वाटपात भाजपकडे गेले आहेत. यामुळे पांडे यांचे तिकिट कापले गेले आहे.

इतर मतदारसंघातून पांडे यांना तिकिट मिळण्याची आशा होती. मात्र, तेथून निवडणूक लढण्यास पांडे तयार नाहीत. पांडे हे आता भाजपकडून तिकिट मिळवण्यासाठी पाटण्यापासून दिल्लीपर्यंत हेलपाटे मारत होते. या दोनपैकी एका मतदारसंघातून तिकिट मिळवण्याचा आटापिटा पांडे यांच्याकडून  सुरू होता.  

पांडे यांनी तिकिट देण्यात भाजपसमोर काही अडचणी आहेत. कारण स्थानिक पातळीवरील बंडखोरीचा मोठा फटका तेथे पक्षाला बसू शकतो. बक्सर हा भाजप खासदार अश्विनी चौबे यांचा बालेकिल्ला आहे. नितीशकुमार यांच्या निष्ठावंताला भाजपकडून उभे करण्यास त्यांचा ठाम विरोध आहे. पांडे यांना तेथून तिकिट देणे चौबे यांना नंतर अडचणीचे ठरू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बिहारमधील सत्तारुढ जेडीयू आणि भाजपने सुरुवातीला सुशांतचा मुद्दा तेथील राजकारणात उचलला. सुशांतला हा मूळचा बिहारचा असल्याने त्याला बिहारचा मुलगा असे संबोधण्यात आले. बिहारच्या मुलाला न्याय मिळायलाच हवा, अशा घोषणा देत जनभावनेला हात घालण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. बिहारमधील प्रचाराच्या रणधुमाळीत सध्या सगळीकडे सुशांतचे बॅनर आणि मास्क यामुळेच दिसत आहेत. 
Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख