म्युकरमायकोसिसचे एक इंजेक्शन सहा ते आठ हजारांना अन् एका रुग्णाला 50 ते 100 इंजेक्शन - amphotericin b injection costs between 6 to 8 thousand rupees | Politics Marathi News - Sarkarnama

म्युकरमायकोसिसचे एक इंजेक्शन सहा ते आठ हजारांना अन् एका रुग्णाला 50 ते 100 इंजेक्शन

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 मे 2021

देशात कोरोनाचा कहर वाढला असून, यात आता म्युकरमायकोसिस आजाराची भर पडली आहे. या आजारावरील उपचार खर्चिक असल्याने रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांची डोकेदुखी वाढू लागली आहे.  

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. काळी बुरशी (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. या रुग्णांना अॅम्फोटेरिसीन-बी (Amphotericin-B) हे इंजेक्शन मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. एका रुग्णाला सुमारे 50 ते 100 इंजेक्शन लागत असून, एका इंजेक्शनची किंमत सहा ते आठ हजार रुपये आहे. 

देशात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यातील सर्वांत मोठी अडचण ही अॅम्फोटेरिसीन-बी इंजेक्शनच्या टंचाईची आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना रुग्णांच्या प्रमाणात इंजेक्शन दिली जात आहेत. परंतु, ही इंजेक्शन अपुरी पडत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. एका रुग्णाला बरे होण्यासाठी सुमारे 50 ते 100 इंजेक्शन लागतात. एका इंजेक्शनची किंमत 6 ते 8 हजार आहे. 

कोरोनातून बरे झालेले रुग्ण आधीच उपचारासाठी खर्च केल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेले असतात. यातच म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यासह कुटुंबीयांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. एक तर इंजेक्शन मिळत नाही आणि मिळाले तरी परवडत नाही, अशी अवस्था अनेकांची होत आहे. रुग्णावर उपचारासाठी इंजेक्शनसाठीच सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचा खर्च होत आहे. गरीब रुग्णांना हा खर्च परवडण्यासारखा नाही. 

देशातील सुमारे 11 राज्यांनी याला साथीचा रोग जाहीर केला आहे. यामुळे सरकारी रुग्णालयात यावरील उपचार मोफत होतात. परंतु, खासगी रुग्णालयात यावर उपचारासाठी मोठा खर्च हत आहे. खासगी रुग्णालयात एका रुग्णाचे बिल 10 ते 15 लाख रुपये होत आहे. परंतु, हे सगळ्यांनाच परवडण्यासारखे नाही. महागडे उपचार परवडू शकत नाहीत अशा रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. आपल्या रुग्णाचा हा जीवघेणा आजार बळी घेत असताना त्याच्या कुटुंबीयांसमोर असहायपणे पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. 

हेही वाचा : मोदी सरकारचा मोठा निर्णय : म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनसाठी पाच कंपन्यांना परवाना 

केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आजपर्यंत म्युकरमायोसिसचे 11 हजार 717 रुग्ण आढळले आहेत. यात गुजरातमध्ये सर्वाधिक 2 हजार 859 रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2 हजार 770 रुग्ण सापडले आहे. आंध्र प्रदेशात 768 रुग्ण आढळून आले आहेत. देशातील म्युकरमायकोसिसच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण या तीन राज्यांत आहेत. दिल्लीतही याची रुग्णसंख्या वाढत असून, आतापर्यंत 620 रुग्ण सापडले आहेत. राज्ये आणि केंद्रशासित अॅम्फोटेरीसिन-बी देण्यात येत आहेत. प्रत्येक राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेच व्हाईल्सचा पुरवठा करण्यात येत आहे. 

म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यानंतर योग्य उपचार न मिळाल्यास रुग्ण काही दिवसांत दगावतो. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे 'सीडीसी'चे म्हणणे आहे. भारतात या आजाराचे दरवर्षी सुमारे डझनभर रुग्ण सापडतात. सर्वसाधारणपणे शरीर अशा प्रकारच्या बुरशीला प्रतिकार करते. परंतु, प्रतिकारशक्ती कमकुवत असलेले याची शिकार होतात. अवयव प्रत्यारोपण करणारे आणि कर्करुग्णांमध्ये हा आजार आधी प्रामुख्याने आढळून येत होता. याआधी सार्सची साथ आली होती त्यावेळी या आजाराचे काही रुग्ण सापडले होते. देशात आतापर्यंत या आजारामुळे दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख