अमित शहांचा सरकारी दौरा अद्याप जाहीर नाही...पण नारायण राणे म्हणतात, ते येणारच! - amit shah will be inaugurating medical college of narayan rane | Politics Marathi News - Sarkarnama

अमित शहांचा सरकारी दौरा अद्याप जाहीर नाही...पण नारायण राणे म्हणतात, ते येणारच!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन होणार आहे.  

ओरोस (सिंधुदुर्ग) : भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या (ता.7) माजी मुख्यमंत्री व भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजचे उद्‌घाटन होणार आहे. दरम्यान, कृषी कायद्यांविरोधातील देशव्यापी चक्काजाममुळे आजचा शहा यांचा दौरा रद्द झाला होता. उद्याचा सरकारी दौरा उद्याप प्राप्त झाला नसला तरी राणे यांनी मात्र, शहा येणार असल्याचे जाहीर केले आहे.

शहा आज दौऱ्यावर येणार होते; परंतु कृषी कायद्यांविरोधात देशव्यापी चक्काजाम आंदोलन आज असल्याने त्यांनी दौरा रद्द केला. यामुळे राणे यांनीही उद्‌घाटन एक दिवसासाठी पुढे नेले आहे. शहांचा शासकीय दौरा प्राप्त झाला नसला तरी शहा येणार असल्याचा विश्वास राणेंनी व्यक्त केला आहे. त्यानुसार अमित उद्या जिल्ह्यात येत आहेत. शहा यांच्या दौऱ्याची तारीख बदलली तरी यापूर्वी जाहीर वेळेनुसार ते, उद्या येणार असून त्याच वेळेत येथून हेलिकॉप्टरने गोव्यासाठी रवाना होणार आहेत.

मेडिकल कॉलेजच्या उद्‌घाटनासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार, नेते विनोद तावडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित असणार आहेत.

सिंधुदुर्ग भाजपने शहांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे. आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश सचिव प्रमोद जठार, अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी यासाठी नियोजन केले आहे. शहा हेलिकॉप्टरने जिल्ह्यात येऊन जाणार असले तरी त्यानिमित्त वातावरण निर्मिती करण्यासाठी जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी हजारो बॅनर लावण्यात आले आहेत. उद्‌घाटन कार्यक्रमानंतर शहा हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचेही राणे यांनी पूर्वीच जाहीर केले आहे.

या कार्यक्रमाविषयी नारायण राणे म्हणाले की, लाईफटाईम मेडिकल कॉलेजचे उद्‌घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत असल्याचा आनंद आहे. सिंधुदुर्गातील या मेडिकल कॉलेजचे नाव संपूर् देशभरात होईल. जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे, हे पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असल्याचा खूप आनंद मला होत आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख