अमित शहांचे पुत्र जय आता सांभाळणार आशियाई क्रिकेटची धुरा! - amit shah son jay shah elected as president of asian cricket council | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

अमित शहांचे पुत्र जय आता सांभाळणार आशियाई क्रिकेटची धुरा!

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जानेवारी 2021

केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.  

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) अध्यक्षपदी आज निवड झाली. जय हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव आहेत. एसीसीचे मावळते अध्यक्ष व बांगलादेश क्रिकेट मंडळाचे (बीसीबी) प्रमुख नझमुल हुसेन यांच्याकडून एसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे जय शहा स्वीकारतील. 

एसीसी ही आशियातील क्रिकेटची प्रशासकीय समिती आहे. तिच्या सध्या 24 सदस्य संघटना आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची अँजिओप्लास्टी झाली असून, बीसीसीआयची धुराही सध्या जय शहा सांभाळत आहेत. देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक नियोजित पद्धतीने पार पडावे, यासाठी ते सध्या धावाधाव करीत आहेत. सईद मुश्ताक अली टी20 स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर बीसीसीआय आता विनू मांकड ट्रॉफी 19 वर्षांखालील स्पर्धेची तयारी करीत आहे. यासाठी जय शहांनी सर्व राज्य संघटनांना तयारीचे आदेश नुकतेच दिले होते. 

जय शहांची एसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे ट्विट बीसीसीआयचे खजिनदार अरुणसिंह धुमल यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. जय शहा हे या पदाची धुरा सांभाळत आहेत. ते आणखी उंचीवर जातील आणि आशियातील क्रिकेटला त्यांच्या नेतृत्वामुळे फायदा होईल. त्यांच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख