पंजाब काँग्रेसमध्ये बंड...पक्षाचे प्रभारी चॉपरमधून थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला - amid revolt in punjab congress harish rawat holds discussion with amarinder singh | Politics Marathi News - Sarkarnama

पंजाब काँग्रेसमध्ये बंड...पक्षाचे प्रभारी चॉपरमधून थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

वृत्तसंस्था
शनिवार, 17 जुलै 2021

पंजाब काँगेसमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात नवज्योतसिंग सिद्धू यांनी उघड बंड पुकारले आहे. 

नवी दिल्ली : पंजाब (Punjab)  काँगेसमधील (Congress) संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या विरोधात काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu)  यांनी उघड बंड पुकारले आहे. हे बंड शमवण्यासाठी पक्षाने आतापर्यंत केलेले सर्व उपाय नाकामी ठरले आहेत. यामुळे पक्षाचे प्रभारी हरीश रावत आज थेट चॉपरने अमरिंदरसिंग यांच्या भेटीला दाखल झाले. 

सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या प्रस्ताव पक्षाने ठेवला होता. यावर कॅप्टन नाराज झाले आहेत. त्यांनी याबद्दल पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहिले होते. कॅप्टन यांनीही नुकतीच सोनिया गांधी यांची  भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सांगतील तो तोडगा मान्य असेल, असे म्हटले होते. कॅप्टन यांचे पत्र मिळताच पक्ष नेतृत्वाने तातडीने रावत यांनी चॉपरने पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या भेटीसाठी पाठवले आहे. ते पंजाबमध्ये दाखल झाले आहेत. पक्षातील बंड शमवण्याबाबत ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. 

सिद्धू यांनी 16 जुलैला सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यावेळी पक्षाचे पंजाब प्रभारी हरीश रावत हेसुद्धा उपस्थित होते. या बैठकीनंतर बोलताना रावत म्हणाले की, सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यांना प्रदेशाध्यपद देण्याबाबत मी कधीच बोललो नाही. याबाबत सोनिया गांधींनी निर्णय घेतल्यावर आम्ही तुम्हाला कळवू. 

सिद्धूंना अद्याप प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला नसल्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. यामागे कॅप्टन यांनी नोंदवलेला विरोध कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. यामुळेच तातडीने सिद्धू यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या भेटीला बोलावण्यात आले. कॅप्टन आणि सिद्धू यांच्या वादात पक्ष नेतृत्वही कात्रीत सापडल्यासारखे झाले आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनीही या संदर्भात गांधी परिवाराची भेट घेतली होती. त्यांनीही याबाबत तोडगा सुचवला आहे. परंतु, तो दोन्ही बाजूंना मान्य नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केल्याची चर्चा सुरू झाली होती. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटवले जाईल. सिद्धू यांच्यासोबत दोन कार्यकारी अध्यक्ष दिले जातील. यातील एक दलित आणि एक हिंदू असेल, असा तोडगा समोर आला होता. परंतु, याला कॅप्टन यांचा विरोध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : कॅप्टनच्या विरोधामुळे सिद्धूंना सलामीला उतरण्याआधीच पक्षानं बोलावलं परत!

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख