काँग्रेसमधील संघर्ष चिघळला..मुख्यमंत्र्यांनी बोलावली निवडक आमदारांची बैठक

पंजाब काँगेसमधील संघर्षावर हाय कमांडने शोधलेला तोडगा तकलादू ठरला आहे.
amarinder singh oppose navjot singh sidhu for punjab congress president
amarinder singh oppose navjot singh sidhu for punjab congress president

नवी दिल्ली : पंजाब (Punjab)  काँगेसमधील (Congress) संघर्षावर हाय कमांडने शोधलेला तोडगा तकलादू ठरला आहे. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu)  यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. मात्र, यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) नाराज झाले असून, त्यांनी समर्थक आमदारांची स्वतंत्रपणे बैठक घेतली आहे. यानंतर सिद्धू यांनीही समर्थकांची वेगळी बैठक घेतल्याने काँग्रेसमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. 

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटलवे जाईल. सिद्धू यांच्यासोबत दोन कार्यकारी अध्यक्ष दिले जातील. यातील एक दलित आणि एक हिंदू असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष देण्याच्या निर्णयाने कॅप्टन नाराज झाले आहेत. त्यांनी याबद्दल पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. कॅप्टन यांनी तातडीने त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक बोलावून चर्चा केली. सरकार आणि पक्षाचे नेतृत्व करणारे दोन्ही जाट शीख असावेत याला कॅप्टन यांचा विरोध आहे. कॅप्टन यांनी बैठक घेतल्याचे कळताच सिद्धू यांनीही त्यांच्या समर्थकांची वेगळी बैठक घेतली. यामुळे काँग्रेसमधील संघर्ष आणखी चिघळल्याचे मानले जात आहे. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. सिद्धू यांनी 30 जूनला प्रियांका गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.  त्यानंतर राहुल गांधी आणि सिद्धू यांची भेट झाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची नुकतीच भेट घेतली होती. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे त्याआधी पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी ही भेट होती. राज्यात काँग्रेसचे नेतृत्व अमरिंदर करतील हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधील संघर्ष वाढू लागल्याने दिवसेंदिवस नेतृत्वाची डोकेदुखी वाढू लागली होती. या पार्श्वभूमीवर अमरिंदरसिंग यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट महत्वूपर्ण मानली जात होती. 

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडाजंगी होत होती. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसत होते. सिद्धू यांची लोकप्रियता जास्त असल्याने पक्ष नेतृत्वालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अवघड बनले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com