नितीशकुमार देणार ओवेसींना धक्का...'एमआयएम'चे पाचही आमदार गळाला..? - all five mlas of asaduddin owaisi aimim meet bihar chief minister nitish kumar | Politics Marathi News - Sarkarnama

नितीशकुमार देणार ओवेसींना धक्का...'एमआयएम'चे पाचही आमदार गळाला..?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

बिहारमध्ये सत्ताधारी भाजप आणि जेडीयूमधील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. आता भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप होणाऱ्या ओवेसींना धक्का देण्याच्या तयारीत नितीशकुमार आहेत. 

पाटणा : बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सरकार सत्तेवर आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी असूनही, नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदी आहेत. मागील काळात दोन्ही पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. आता भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप होणाऱ्या असदुद्दीन ओवेसींना धक्का देण्याच्या तयारीत नितीशकुमार आहेत. ओवेसींच्या 'एआयएमआयएम'च्या पाचही आमदारांनी नितीशकुमारांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. 

आता नितीशकुमार यांनी आक्रमकपणे पक्ष विस्तारासाठी पावले उचलली आहेत. बिहारमधील बहुजन समाज पक्षाचे एकमेव आमदार जामा खान यांनी मागील आठवड्यात जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर अपक्ष आमदार सुमंतसिंह यांनीही जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमारसिंह यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. यामुळे ते जेडीयूमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात आहे.   

रामविलास पासवान यांचे पुत्र व लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) अध्यक्ष चिराग पासवान यांच्यामुळे जेडीयूला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. एलजेपीने राज्यभरात भाजपच्या विरोधात उमेदवार दिले नव्हते मात्र, जेडीयूच्या विरोधात उमेदवार दिले होते. अनेक भाजप नेत्यांनी पक्ष सोडून लोक जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जेडीयू उमेदवारांच्या निवडणूक लढवली होती. याचबरोबर चिराग पासवान यांनी सातत्याने नितीशकुमार यांना लक्ष्य केले होते. यामागे भाजपचा हात असल्याचा आरोपही त्यावेळी झाला होता.  

याचबरोबर बिहारमध्ये 'एआयएमआयएम'चे पाच आमदार निवडून आले आहेत. त्यावेळी ओवेसी हे भाजपची 'बी टीम' असल्याची टीका काँग्रेससह अनेक पक्षांनी केली होती. कारण 'एआयएमआयएम'ने भाजपच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणास मदत करण्यासोबत मुस्लिमांची मते आकर्षित करुन घेतली होती. बिहारच्या आधीही अनेक ठिकाणी ओवेसींमुळे भाजपला फायदा आणि इतर पक्षांचे नुकसान झाल्याचे प्रकार समोर आले होते. हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीतही हाच प्रकार घडला होता. 

'एआयएमआयएम'च्या पाचही आमदारांनी आज नितीशकुमारांची भेट घेतली. 'एआयएमआयएम'चे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अख्तर-उल-इमान, मोहम्मद अजहर अस्फी, शहनवाज आलम, सईद रुकुनुद्दीन आणि अजहर नयीमी यांचा यात समावेश आहे. त्यांनी बिहारचे मंत्री व जेडीयू नेते विजय चौधरी यांच्यासोबत मुख्यमंत्री नितीशुकमार यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. 

दरम्यान, या भेटीबद्दल जेडीयू तसेच, एआयएमआयएमचे नेते काहीही बोलणे टाळत आहेत. मात्र, 'एआयएमआयएम'चे नेते मोहम्मद अदिल हसन यांनी याचा इन्कार केला आहे. ते म्हणाले की, आमच्या पक्षाचे सर्व आमदार सीमांचल भागातील आहेत. ते भागाच्या विकासासाठी नितीशकुमारांना भेटले होते. आमचा नितीशकुमारांना नव्हे तर भाजपला विरोध होत आहे. नितीश यांनी भाजपची साथ सोडली तर ओवेसी यांच्यासोबत हातमिळवणी करण्यास ओवेसी कायम तयार आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख