स्वीकृत सदस्यपदासाठी खासदार संजय धोत्रेंचा "कॉम्बो पॅक '

स्वीकृत सदस्यपदासाठी खासदार संजय धोत्रेंचा "कॉम्बो पॅक '

पक्ष संघटनेसाठी अहोरात्र झटणारे भाजपचे महानगर सचिव डॉ. विनोद बोर्डे यांना संधी देत मराठा कार्ड खेळण्यात आले. तर भाजपचे निवडणूक घोषवाक्‍य असलेल्या "सबका साथ सबका विकास' साधण्यासाठी ठाकूर समाजाचे युवा नेतृत्व असलेले सुजीत ठाकूर यांची स्वीकृत सदस्य पदी वर्णी लावत राजकारणात "सोशल इंजिनिअरींग' चा फंडा यशस्वी केला आहे.

अकोला : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा गड सर करण्यासाठी खासदार संजय धोत्रे यांनी सामाजिक गणित जुळवित महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदासाठी "कॉम्बो पॅक' ची रणनिती खेळली आहे. गिरीष गोखले, डॉ. विनोद बोर्डे आणि सुजीत ठाकूर यांची या पदावर वर्णी लावत मराठा, ब्राम्हण आणि हिंदी भाषीक असलेल्या ठाकूर समाजाला झुकते माप देऊन खासदार धोत्रेंनी "चाणक्‍य निती' अवलंबली आहे. 

कधीकाळी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या अकोला जिल्ह्यात आजमितीस कॉंग्रेसची वाट बिकट झाली आहे. अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे कॉंग्रेस पक्षाची अनेक शकले पडली आहेत. काही अशी ही परिस्थिती भाजपमध्येही आहे. मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारणावर आपला प्रभाव कायम ठेवणारे खासदार संजय धोत्रे यांनी शहरासह ग्रामीण भागात पक्ष संघटन अधिक मजबुत करीत भाजपचे अच्छे दिन आणले. 

त्यांच्या या कामात ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, अभ्यासू आणि कार्यकर्त्यांसाठी अहोरात्र सज्ज असणारे आमदार रणधीर सावरकर यांची त्यांना भक्कम साथ मिळाली. पक्ष संघटनेत जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात आणि महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांचे संघटन कौशल्य भाजपच्या वाढीसाठी चांगलेच पोषक ठरले. भाजपची सध्या जी यशस्वी घौडदौड सुरू आहे ती आगामी काळातही ती कायम राहण्यासाठी खासदार धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा आणि आमदार रणधीर सावरकर यांनी महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीच्या माध्यमातून सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे. 

संघाच्या जळणघडणीत वाढलेले भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस गिरीश गोखले या ब्राम्हण समाजातल्या व्यक्तीची स्वीकृत सदस्य पदावर वर्णी लावत त्यांनी संघाची मर्जी राखली. काही काळ गोखले हे खासदार धोत्रे गटाचे पक्षातंर्गत विरोधक समजल्या जाणारे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील गटात सक्रीय होते. मात्र, या स्वीकृत सदस्यपदी त्यांची वर्णी लावत "एका दगडात दोन पक्षी' मारण्याची खेळी धोत्रेंनी यशस्वी केली. 

हे करीत असताना पक्ष संघटनेसाठी अहोरात्र झटणारे भाजपचे महानगर सचिव डॉ. विनोद बोर्डे यांना संधी देत मराठा कार्ड खेळण्यात आले. तर भाजपचे निवडणूक घोषवाक्‍य असलेल्या "सबका साथ सबका विकास' साधण्यासाठी ठाकूर समाजाचे युवा नेतृत्व असलेले सुजीत ठाकूर यांची स्वीकृत सदस्य पदी वर्णी लावत राजकारणात "सोशल इंजिनिअरींग' चा फंडा यशस्वी केला आहे. 

स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागलेल्या या तीनही सदस्यांनी पक्षासाठी केलेल्या कार्याची ही पावती म्हटली जात असले तरी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत सामाजिक गणितांचे राजकारण ज्या पद्धतीने यशस्वी ठरले तीच रणनिती स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीत खेळून खासदार धोत्रे गटाने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा, ब्राम्हण आणि हिंदी भाषिक समाजाला भाजपशी जोडण्याची यशस्वी खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in