अजित पवार आज बाजार समितीबाबत घेणार महत्वाचा निर्णय  - Ajit Pawar will take an important decision regarding the market committee today | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवार आज बाजार समितीबाबत घेणार महत्वाचा निर्णय 

गणेश कोरे 
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार आणि पणन विभागातील उच्चाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. 

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या मुदतवाढीबाबत आज (शुक्रवार, ता.21) शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबत पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार आणि पणन विभागातील उच्चाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीला प्रशासक देशमुख देखील उपस्थित राहणार असल्याचे समजते. 

बाजार समितीच्या प्रशासक आणि सचिवपदी देशमुख यांनी प्रशासकीय काळात सर्वाधिक काळ काम केले. याकाळात बाजार समितीचे आर्थिक उत्पन्न मोठ्याप्रमाणावर वाढवित 200 कोटी रुपयांपर्यंत ठेवी केल्या आहेत. तर  न्यायालयीन खटल्यांमध्ये अडकेलेल्या विविध जागा देखील बाजार समितीच्या ताब्यात घेत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बाजार समितीच्या नावावर केल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. 

दरम्यान प्रशासकीय राजवटीमध्ये मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते सुरेश घुले आणि प्रकाश म्हस्के यांनी करत, देशमुख यांची हकालपट्टी सह चौकशी करण्याची मागणी पणन मंत्र्यांकडे केली आहे. 

या मागणीसाठी म्हस्के, घुले यांनी पालकमंत्री पवार यांच्याकडे साकडे घातले होते. मात्र, हा विषय माझा नसल्याचे त्यांच्या स्टाईलमध्ये सांगत पणन मंत्र्यांकडे जाण्याचे सांगितल्याचे समजते. 

दरम्यान म्हस्के, घुले यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचा लेखी सविस्तर खुलासा देशमुख यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन केला आहे. यावेळी पवार यांनी खुलासा सविस्तर वाचून देशमुख यांच्या सोबत चर्चा देखील केली असल्याचे समजते.
 
तर देशमुख यांची मुदत 31 आॅगस्ट रोजी संपत असून, मुदतवाढीसह पणन विभागातील विषयांवर आज दुपारी पणन संचालक सतिश सोनी, अपर आयुक्त (प्रशासन) यांना पालकमंत्री यांनी बैठकीसाठी बोलवले आहे. या बैठकीसाठी वेळ देखील राखीव ठेवण्यात आल्याचे पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात स्पष्ट केले आहे. 

दरम्यान पूना मर्चंटस चेंबरने देखील देशमुख यांच्या मुदतवाढीसाठी पालकमंत्री पवार यांना पत्र दिले आहे. पत्र घेऊन अध्यक्ष पोपटशेठ ओस्तवाल वालचंद संचेती, राजेश शहा यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे.

हेही वाचा : जयंत पाटील यांच्याकडे सहकार खात्याचा तात्पुरता कारभार  
पुणे : राज्याचे सहकार मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना झाल्याने त्यांच्या खात्याचा तात्पुरता कार्यभार जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.  बाळासाहेब पाटील यांची तब्बेत सध्या व्यवस्थित आहे. गेल्या शुक्रवारी त्याच्या कोरोना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहे. राज्यातील अनेक नेत्याना कोरोनाची लागण झाली होती. धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. आता ते कोरोनामुक्त झाले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख