कोल्हापूर-सांगलीला व्हेंटिलेटर बेड पुरवू - अजितदादांचे राजू शेट्टींना आश्वासन - Ajit Pawar gave assurance for ventilator Beds in Sangli Kolhapur Informs Raju Shetty | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हापूर-सांगलीला व्हेंटिलेटर बेड पुरवू - अजितदादांचे राजू शेट्टींना आश्वासन

संपत मोरे
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

"येत्या चार दिवसात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात व्हेंटीलेटरसहीत अतिदक्षतेचे बेड पुरवू,'' असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना दिले आहे. याबाबतची माहिती शेट्टी यांनी पत्रकारांना दिली आहे.

पुणे :  "येत्या चार दिवसात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात व्हेंटीलेटरसहीत अतिदक्षतेचे बेड पुरवू,'' असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना दिले आहे. याबाबतची माहिती शेट्टी यांनी पत्रकारांना दिली आहे.

"कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्य सरकारने तातडीने या दोन  जिल्ह्यांमध्ये लक्ष घालून व्हेंटिलिटरची सुविधा पुरवावी." अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. येत्या चार दिवसात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात व्हेंटीलिटर सहीत अतिदक्षतेचे बेड पुरवू, असे आश्वासन अजित पवार दिले असल्याचे शेट्टी म्हणाले.

याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले "सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. व्हेंटिलिटर अभावी रूग्ण दगावत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. तेथील व्हेंटिलिटर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी देण्यात यावे.  तसेच खासगी रूग्णालयातही बेड अपुरे पडत आहेत. ऑक्सिजनची पातळी खालावल्यास रूग्णांना तातडीने बेड मिळत नाहीत. व्हेंटिलिटर अभावी रूग्ण दगावत आहेत. सांगली जिल्ह्यातील मृत्यू दर सर्वाधिक आहे.  गेले दोन दिवस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधतो आहे,''

ते पुढे म्हणाले, ''कोल्हापूर जिल्ह्यात ३०० व सांगली जिल्ह्यात १५० बेडचा प्रस्ताव गेला आहे. त्यास राज्य सरकारने तातडीने मान्यता द्यावी. अशी मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात तसेच इचलकरंजी शहरात देखील रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. दोन्ही जिल्ह्यात विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.  या पार्श्वभूमीवर तातडीने दोन्ही जिल्ह्यातील कोवीड सेंटरना बुधवारी मान्यता देऊन येत्या चार दिवसात व्हेंटिलिटरसह आयसीयु बेडची सुविधा उपलब्ध करून देऊन असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.''
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख