ब्रेकिंग : सुशांतच्या मृत्यूच्या तपासात 'एम्स'ही करणार मदत

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपास सुरू केला आहे. सीबीआयने या प्रकरणी अनेक जणांची चौकशी सुरू केली असून, या तपासात आता 'एम्स'नेही उडी घेतली आहे.
aiims forensic team to analyze sushant singh rajput case reports
aiims forensic team to analyze sushant singh rajput case reports

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) पथक मुंबईत दाखल झाले असून, त्यांनी तपासास सुरूवात केली आहे. या प्रकरणी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) न्यायवैद्यक पथकाने आता तपासात उडी घेतली आहे. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात सक्त वसुली संचालयानेही (ईडी) उडी घेतली होती. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. 

सीबीआयचे 15 जणांचे पथक मुंबईत तपासासाठी 20 ऑगस्टला दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक सांताक्रूज येथील हवाई दलाच्या गेस्ट हाऊसवर थांबले आहे. आज सकाळपासूनच सीबीआय पथकाने चौकशी सुरू केली आहे. सीबीआय पथकाने प्रथम सुशांतचा स्वयंपाकी नीरज याची चौकशी केली. यानंतर पथकाने मुंबईचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे पथक बांद्रा पोलीस ठाण्यात गेले होते. या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे सीबीआयने मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतली आहेत. सीबीआयने सुशांतचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. 

दिल्लीतील 'एम्स'चे न्यायवैद्यक या प्रकरणात सीबीआयला तपासात मदत करणार आहे. सुशांतच्या मृत्यूसह त्याच्या शवविच्छेदनाचे अहवाल आदी बाबींची तपासणी हे पथक करणार आहे. सीबीआयनेच या प्रकरणी एम्सकडे धाव घेतली होती. यानंतर एम्सने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

याविषयी बोलताना 'एम्स'च्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले की, सुशांत प्रकरणातील अहवाल सीबीआय आम्हाला देणार आहे. सीबीआय हे सर्व अहवाल जमा करीत आहे. लवकरच सीबीआय हे अहवाल आमच्याकडे सादर करेल. आम्ही शरीरावरील जखमा आणि इतर घटनास्थळी सापडलेले पुरावे यांचा अभ्यास करु. याचबरोबर शवविच्छेदनानंतर राखून ठेवलेल्या पुराव्यांचेही परीक्षण करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष बरोबर की चूक हे तपासण्यात येईल. यातून सुशांतचा मृत्यू गळफासामुळे झाला की त्याची हत्या झाली हे स्पष्ट होईल.  

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी 56 जणांचे जबाब नोंदविले होते. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com