'एम्स'चे प्रमुख म्हणतात, कोरोनाची तिसरी लाट येईल अन् त्यावर संचारबंदी, वीकएंड लॉकडाउनचा उपयोग नाही! - AIIMS director randeep guleria says third wave of covid will come | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

'एम्स'चे प्रमुख म्हणतात, कोरोनाची तिसरी लाट येईल अन् त्यावर संचारबंदी, वीकएंड लॉकडाउनचा उपयोग नाही!

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 मे 2021

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, आज रुग्णसंख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, आज रुग्णसंख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्याने रुग्णालये अपुरी पडू लागली असून, आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिला आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी काय तयारी करायला हवी, याबद्दलही त्यांनी सूचना केल्या आहेत. (AIIMS director Randeep Guleria says third wave of covid will come) 

डॉ. गुलेरिया म्हणाले की, कोरोनाविषाणूचे स्वरुप असेच बदलत राहिले तर देशात कोरोनाची तिसरी लाट येईल. यावर रात्रीची संचारबंदी आणि वीकएंड लॉकडाउन हे उपाय ठरू शकत नाही. यासाठी प्रथम आपण वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढवायला हव्यात. याचबरोबर रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि वेगाने लसीकरण व्हायला हवे. संसर्गाची साखळी तोडायची असेल तर मनुष्यांमधील संपर्क कमी करण्याची आवश्यकता असते. त्यावेळी कडक लॉकडाउनचा पर्याय समोर येतो. 

ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या पद्धतीने लॉकडाउन लावण्यात आला त्याचे अनुकरण करायला हवे. ज्या भागात कोरोनाचा संसर्ग झालेला आहे तिथे अथवा राज्य पातळीवर कडक लॉकडाउन लावावा. लोकांच्या जिविताचा विचार करुन धोरणकर्त्यांनी  लॉकडानच्या सर्व बाबी विचारात घ्यायला हव्यात. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवताना रोजंदारी मजूर उपाशी मरणार नाहीत याचीही काळजी घ्यायला हवी. लॉकडाउन म्हणजे संपूर्ण बंदच हवा, असे डॉ. गुलेरिया यांना सांगितले. 

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 2 लाख 82 हजार 833 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 22 हजार 408 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 57 हजार 229 रुग्ण सापडले आहेत.  मागील 24 तासांत 3 हजार 449 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

हेही वाचा : अदर पूनावाला करणार ब्रिटनमध्ये 2 हजार 200 कोटींची गुंतवणूक 

महाराष्ट्रात मागील 24 तासांत सर्वाधिक 48 हजार 621 रुग्ण सापडले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये 44 हजार 438 आणि उत्तर प्रदेशमध्ये 29 हजार 52 रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल. आंध्र प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड यांच्या समावेश आहे. तसेच, देशातील एकूण कोरोना मृत्यूंमध्ये 73.15 टक्के या राज्यांतील आहेत. दिलाशाची बाब म्हणजे या बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही या दहा राज्यांत अधिक असून, हे प्रमाण 73.14 टक्के आहे. 

सक्रिय रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक 
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाख 47 हजार 133 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 17 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 81.91 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 66 लाख 13 हजार 292 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.10 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  
2 कोटी : 4 मे 

Edited by Sanjay Jadhav 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख