'एम्स'चे प्रमुख म्हणतात, कोरोनाची तिसरी लाट अपरिहार्य..6 ते 8 आठवड्यांत येणार

कोरोनाचीतिसरी लाट पुढील 6 ते 8 आठवड्यांत येणार असल्याचा अंदाज अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) प्रमुख डॉ.रणदीप गुलेरिया यांनी वर्तवला आहे.
aiims chief randeep guleria says covid third wave will hit in six to eight weeks
aiims chief randeep guleria says covid third wave will hit in six to eight weeks

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेत (Second Wave) आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. आता तिसरी लाट (Third Wave) पुढील 6 ते 8 आठवड्यांत येणार असल्याचा अंदाज दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) प्रमुख डॉ.रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी वर्तवला आहे. तिसरी लाट येणे अपरिहार्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

देशातील अनेक राज्यांत आता निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ.रणदीप गुलेरिया म्हणाले की, देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणे अपरिहार्य आहे. ही लाट पुढील 6 ते 8 आठवड्यांत येण्याची शक्यता आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त लोकंसख्येचे कोरोना लसीकरण करणे अतिशय गरजेचे आहे. लोक कोरोनाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करु लागले आहेत. मागील दोन लाटांकडे बघून आपण शिकलो नाही असेच आता म्हणावे लागत आहे. 

अनेक ठिकाणी होत असलेली गर्दी पाहता तिसरी लाट येण्यास 6 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागेल. रुग्णसंख्या टप्प्याटप्प्याने वाढण्यास सुरवात होईल आणि नंतर ती राष्ट्रीय पातळीवर वाढलेली दिसेल. यासाठी 6 ते 8 आठवडे एवढा कालावधी लागू शकतो. याचबरोबर भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्यात एक नवी आघाडी सुरू करण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूच्या बदलत्या प्रकारांचा अभ्यास करण्यासाठी हे आवश्यक आहे. भारतातून जगभरात गेलेले डेल्टा-प्लस हा कोरोना विषाणूचा प्रकार धोकादायक मानला जात आहे. 

देशात कोरोना लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी असून, केवळ 5 टक्के लोकसंख्येचे लसीकरण झालेले आहे. सरकारने डिसेंबर अखेरपर्यंत 108 कोटी जनतेचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठरवले आहे. यावर डॉ.गुलेरिया म्हणाले की,  मुख्य आव्हान लसीकरणाचे आहे. आपले लसीकरण झाले असेल तरच आपले कोरोनापासून संरक्षण होईल.

महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचाही अंदाज 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्सची बैठक 16 जूनला झाली. या बैठकीत तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तिसऱ्या लाटेचा अंदाज मांडण्यात आला होता. तिसरी लाट पुढील दोन ते चार आठवड्यांत येणार असल्याचा अंदाज महाराष्ट्राच्या टास्क फोर्सने व्यक्त केल्याचे वृत्त होते आहे. मागील काही दिवसांतील राज्यातील अनेक शहरांतील गर्दीचा अभ्यास करुन हा अंदाज वर्तवण्यात आल्याचेही सांगण्यात आले होते. नंतर टास्क फोर्सने असा अंदाज वर्तवल्याचा इन्कार केला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com