तमिळनाडूत राजकीय भूकंप : शशिकलांची राजकारणासह सार्वजनिक जीवनातून तडकाफडकी निवृत्ती

शशिकला यांच्या चार वर्षानंतर राज्यात झालेल्या पुनरागमनानंतर तमिळनाडूत राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू लागली होती.
aidmk expelled leader sasikala natrajan quits politics before tamil nadu election
aidmk expelled leader sasikala natrajan quits politics before tamil nadu election

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांच्या चार वर्षानंतर झालेल्या पुनरागमनानंतर तमिळनाडूत राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू लागली होती. आता अचानक शशिकलांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती जाहीर करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

शशिकलांनी आज एक पत्र जाहीर केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जया (जयललिता) जिवंत असताना मी कधीही सत्ता अथवा पदाच्या मागे धावले नाही. तिचा मृत्यू झाल्यानंतर असे कदापी घडणे शक्य नाही. तमिळनाडूत अण्णाद्रमुकला सोन्याचे दिवस यावेत यासाठी मी राजकारणापासून दूर राहत आहे. 

मी ईश्वर आणि माझ्या बहिणीला (जयललिता) प्रार्थना करते की, अण्णाद्रमुकच्या विजयासह पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. त्यांनी एकत्र येऊन द्रमुकचा पराभव करावा. जयललितांचा वारसा कायम राखण्यासाठी पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी काम करावे, असेही शशिकला यांनी पत्रात म्हटले आहे. 

शशिकला यांनी पत्रात भाजपचेही आभार मानले आहेत. भाजपने तमिळनाडूत अण्णाद्रमुकशी आघाडी केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये  मतविभाजणी झाली होती. तसा प्रकार होऊन नये यासाठी अण्णाद्रमुक एक राहावा म्हणून भाजपने प्रयत्न केले. याबद्दल मी त्यांचे आभार मानते, असे शशिकलांनी म्हटले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजप आणि अण्णाद्रमुक आघाडीचा तमिळनाडूत मोठा पराभव झाला होता. अण्णाद्रमुकला केवळ एक जागा मिळाली होती. त्याचवेळी द्रमुक आणि काँग्रेस आघाडीला तब्बल 38 जागा मिळाल्या होत्या. 

शशिकला यांनी चेन्नई न्यायालयामध्ये मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह अण्णाद्रमुक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात नव्याने अर्ज केला होता. शशिकला या पक्षाच्या सरचिटणीस होत्या, पण २०१७ मध्ये त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यावेळीच शशिकला यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. आता त्यांनी या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार १५ मार्चला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. 

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.

चार वर्षाची शिक्षा भोगून शशिकला काही दिवसांपूर्वीच राज्यात परतल्या आहेत. त्यामुळे सरकारमध्ये मोठी अस्वस्थता आहे. शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली होती. आता शशिकलांनी निवृत्तीची घोषणा करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com