चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांच्या चार वर्षानंतर झालेल्या पुनरागमनानंतर तमिळनाडूत राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू लागली आहेत. शशिकलांमुळे सरकारमध्ये मोठी अस्वस्थता असून, आता पक्षाने शशिकलांबद्दल जाहीरपणे न बोलण्याची भूमिका घेतली आहे. याचवेळी शशिकलांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांना लक्ष्य करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
शशिकलांबद्दल आक्रमक भूमिका घेणाऱ्या सत्ताधारी अण्णाद्रमुकने अचानक मवाळ भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांच्यासाठी आधी शशिकला गॉडफादर ठरल्या होत्या. राज्याच्या राजकारणात त्या दोघांना पुढे आणण्याचे श्रेय शशिकलांना जाते. आता अण्णाद्रमुकच्या नेत्यांना थेटपणे शशिकलांवर टीका करणे अचानक बंद केले आहे. यामागे कारण आहे शशिकलांना पक्षातील वाढता पाठिंबा. त्यांच्या चर्चा न करता अनुल्लेखाने मारण्याची खेळी खेळण्यात आली आहे.
याचवेळी शशिकलांचे भाचे व अम्मा मक्कम मुनेत्र कळघम पक्षाचे आमदार टी.टी.व्ही. दिनकरन यांना सत्ताधारी अण्णाद्रमुककडून लक्ष्य करण्यात येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शशिकलांच्या सुटका झाली असून, यामुळे अण्णाद्रमुकच्या नेतृत्व गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्यांच्याबद्दल नेमकी कोणती भूमिका घ्यावी यामुळे नेते संभ्रमात पडले असून, आता नेतृत्वाने त्यांच्याबद्दल बोलूच नका, असे आदेश नेत्यांनी दिले आहेत.
शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्या बंगळूरमध्ये विश्रांती घेत होत्या.
शशिकलांचे नुकतेच राज्यात आगमन झाले. त्यावेळी अण्णाद्रमुकने विरोध करुनही त्यांनी पक्षाचा ध्वज मोटारीवर लावला होता. सुरक्षेसाठी तमिळनाडू-कर्नाटक सीमेवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांनी तमिळनाडूत प्रवेश केल्यानंतर समर्थकांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर फुलांची उधळण केली होती. रस्त्यातच्या दुतर्फा समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांचे स्वागताचे मोठे फलक लावण्यात आले होते. चेन्नईच्या रस्त्यावरही मोठे फलक लावण्यात आले आहेत. कर्नाटक सीमेवरून त्या थेट चेन्नईकडे रवाना झाल्या होत्या.
Edited by Sanjay Jadhav

