चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांच्या सुटकेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरवात झाली आहे. शशिकलांची सुटका झाल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी सत्ताधारी अण्णाद्रमुकच्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. शशिकलांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करणाऱ्या नेत्यांवर पक्षाने कारवाईची कुऱ्हाड चालवली असली तरी दिवसेंदिवस स्वागत करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढतच आहे. यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 31 जानेवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु, कोरोना संसर्गामुळे त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर त्या 7 फेब्रुवारीला तमिळनाडूत परतणार आहेत.
शशिकलांच्या स्वागतासाठी राज्यभरातील अण्णाद्रमुकचे नेते बॅनरबाजी करु लागले आहे. अनेक नेत्यांनी शशिकला यांचा उल्लेख पक्षाच्या कायमस्वरुपी सरचिटणीस केला आहे. आधी त्रिची आणि तिरुनेलवेल्लीमध्ये शशिकलांचे स्वागत करणारे बॅनर अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी लावले होते. त्यावेळी बॅनर लावणाऱ्या दोन नेत्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती.
आता मदुराई आणि शिवगंगा शहरात शशिकलांचे स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. या प्रकरणी पक्षाच्या तीन नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. पक्षाकडून कडक कारवाई सुरू असली तरी दिवसेंदिवस आणखी नेते शशिकलांचे स्वागत करण्यासाठी पुढे येत आहेत. यामळे कारवाई तरी किती नेत्यांवर करायची, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यामुळे पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.
शशिकला या तमिळनाडूत परतण्याआधीच अण्णाद्रमुकमध्ये बंडाचे वारे सुरू झाले आहे. त्या राज्यात दाखल झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात पक्षात उलथापालथ होईल. शशिकलांचे स्वागत करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करुन पक्ष सगळ्यांचा आवाज दाबू शकत नाही. त्याच खऱ्या अर्थाने जयललितांच्या वारसदार आहेत, अशी माहिती अण्णाद्रमुकच्या एका नेत्याने दिली.
शशिकलांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
शशिकला मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
Edited by Sanjay Jadhav

