अण्णाद्रमुकचे सहकारी पक्ष अन् संलग्न आमदारांचा शशिकलांनाच पाठिंबा! - aiadmk ally dmdk and mla announced support for v k sasikala | Politics Marathi News - Sarkarnama

अण्णाद्रमुकचे सहकारी पक्ष अन् संलग्न आमदारांचा शशिकलांनाच पाठिंबा!

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जानेवारी 2021

शशिकला यांची तब्बल चार वर्षांनंतर कारागृहातून सुटका झाली आहे. मात्र, त्यांच्या सुटकेने सत्ताधारी अण्णाद्रमुकमध्ये उलथापालथ घडू लागली आहे. 

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांची तब्बल चार वर्षांनतर कारागृहात सुटका झाली आहे. त्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तमिळनाडूत परतणार आहेत. आता अण्णाद्रमुकसह सहकारी पक्षांमध्ये शशिकलांना पाठिंबा वाढू लागला आहे. अण्णाद्रमुकशी संलग्न आमदारांनी थेटपणे शशिकलांना पाठिंब्याची घोषणा केली आहे. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची 27 जानेवारीला सुटका झाली आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना दोन दिवसांत रुग्णालयातून सोडले जाण्याची शक्यता आहे. त्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तमिळनाडूत परततील. 

शशिकलांकडील 1 हजार 911 कोटी रूपये बेनामी मालमत्ताच; अडचणीत होणार आणखी वाढ

शशिकलांची सुटका झाल्यानंतर अण्णाद्रमुक पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शशिकलांना पाठिंबा देणारे गट सक्रिय होऊ लागले आहेत. अभिनेते व राजकारणी एस.करुणास हे अण्णाद्रमुकच्या चिन्हावर निवडून येऊन आमदार झाले आहेत. त्यांनी शशिकलांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जयललितांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची खेळी हाणून पाडत शशिकलांनी पलानीस्वामींना मुख्यमंत्री बनवले होते. शशिकलांच्या विरोधात बोलणाऱ्यांना काहीतरी नैतिकतेची चाड असायला हवी. जयललिता आणि शशिकला यांनी माझ्या मुक्कलाथोर पुलिपडाई या संघटनेला पाठिंबा दिल्याने मी अण्णाद्रमुक सरकारला पाठिंबा दिला होता. 

याचबरोबर शशिकलांच्या स्वागत करण्यात द्रमुकचा सहकारी पक्ष असलेल्या डीएमडीकेचे नेतेही आघाडीवर आहेत. डीएमडीकेचे सर्वेसर्वा अभिनेते विजयकांत हे सध्या आजारी आहेत. त्यामुळे पक्षाची धुरा त्यांच्या पत्नी प्रेमलता विजयकांत सांभाळत आहेत. त्या पक्षाच्या खजिनदार असून, त्यांनी म्हटले आहे की, शशिकलांचे सक्रिय राजकारणात स्वागत आहेत. एक महिला म्हणून माझा त्यांना पाठिंबा आहे. अण्णाद्रमुकने आम्हाला 2011 मध्ये 41 जागा दिल्या होत्या. आताही तेवढ्याच जागा आगामी विधानसभा निवडणुकीत द्याव्यात. 

उपमुख्यमंत्र्यांच्या पुत्राचे शशिकलांना सदिच्छा देणारे ट्विट...अण्णाद्रमुकमध्ये फुटीची बीजे

शशिकलांच्या मुख्यमंत्रिपदासाठी पनीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. 

शशिकलांच्या सुटका होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख